राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

मुंबई : राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. 10 राज्यांमधील 37 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वात अगोदर पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आज भाजपनं चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तर, महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर शरद पवार यांना पाठवण्यास सहमती झाल्याचं सांगण्यात आलं आहे. काँग्रेसनं शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकेडून कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महाराष्ट्राच्या विधानसभेत 57 आमदार आहेत. एक उमेदवार निवडून आणण्यास 37 मतांची आवश्यकता आहे. एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेकडे 20 अतिरिक्त मतं आहेत. आता इतर सहा जागांसाठी उमेदवार जाहीर झाले आहेत. एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवारांना संधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमदारांची संख्या 41 इतकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. पार्थ पवार यांना सर्व आमदार मतदान करतील, असं पटेल म्हणाले होते. पार्थ पवार उद्या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपकडून चार उमेदवार जाहीर

भाजपचे त्यांच्याकडील संख्याबळानुसार तीन खासदार सहजपणे विजयी होऊ शकतात. तर, एक जागा विजयी करण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या अतिरिक्त मतांची गरज असेल. भाजपनं विनोद तावडे, रामराव वडकुते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीकडून शरद पवार रिंगणात

काँग्रेस, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून शरद पवार यांच्या नावावर सहमती झाली आहे. शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय मविआनं घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी मविआच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्रातील निवडणूक बिनविरोध होणार?

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. कारण, भाजपनं चार उमेदवार जाहीर केलेत, राष्ट्रवादी काँग्रेसनं एक उमेदवार, मविआतून एक आणि शिवसेनेनं एक उमेदवार दिल्यास महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. तामिळनाडूतून  6,  बिहार आणि पश्चिम बंगालमधून 5 आणि ओडिशा राज्यातून 4, आसामधून 3, तेलंगाणातून 2 आणि छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.