राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली असून राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर महायुतीकडून सहा उमेदवार मैदानात होते. कोणत्याही उमेदवाराने माघार न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झालं. या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीमुळे अनेक राजकीय संदेश आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वात वयोवृद्ध आणि सर्वात तरुण उमेदवार हे एकाच घरातील असल्याची बाब विशेष ठरली आहे.
पवार कुटुंबातील शरद पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे राज्यसभेत खासदार म्हणून असणार आहेत. यापैकी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीनंतर त्या राज्यसभेचा राजीनामा देतील. असं असलं तरी सध्या तरी पवार कुटुंबातील तीन सदस्य हे राज्यसभेत आहेत. तर सुप्रिया सुळे या लोकसभेत खासदार आहेत.
Sharad Pawar : 85 वर्षांचे अनुभवी नेतृत्व पुन्हा राज्यसभेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे तब्बल सहा दशकांच्या राजकीय अनुभवासह तिसऱ्यांदा राज्यसभेत जाणार आहेत. देशाच्या राजकारणात मोठा अनुभव असलेल्या पवार यांना महाविकास आघाडीत सर्वात कमी आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ही संधी मिळाली. त्यांच्या अनुभवामुळे राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांना बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Parth Pawar : 35 वर्षांचे पार्थ पवार संसदेत
या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे पार्थ पवार यांची राज्यसभेवर झालेली निवड. अवघ्या 35 वर्षांचे पार्थ पवार हे आता संसदेत प्रवेश करणार आहेत. 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पार्थ पवार काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचे दिसत होते. मात्र अलीकडील राजकीय घडामोडींनंतर त्यांना थेट राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. यामुळे पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य संसदीय राजकारणात सक्रिय झाला आहे.
Pawar Family Politics : संसद आणि विधानमंडळात पवार घराण्याचे वर्चस्व
सध्याच्या राजकीय परिस्थितीत पवार घराण्यातील तिघे सदस्य संसदेत आणि दोन सदस्य राज्य विधानमंडळात असतील, असे समीकरण तयार झाले आहे. अजित पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार विधिमंडळात दाखल झाल्या, तर त्यांच्या जागी पार्थ पवार राज्यसभेत जाणार आहेत.
Political Signals : भाजपकडून रणनीतिक निवड
महायुतीकडूनही काही महत्त्वाच्या राजकीय संदेशांसह उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. भाजपने विनोद तावडे, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी देत सामाजिक आणि राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.
नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते या आदिवासी समाजातील ‘गोंड’ जमातीच्या असून त्यांच्या माध्यमातून भाजपने आदिवासी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर पुनर्निवड
रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही राज्यसभेवर फेरनिवड झाली आहे. संसदीय राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या आठवले यांनी उमेदवारीनंतर भाजपचे आभार मानले.
Aditya Thackeray : पवारांच्या अर्जावेळी अनुपस्थितीची चर्चा
दरम्यान शरद पवार यांच्या उमेदवारी अर्जावेळी महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. मात्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. ही जागा आपल्या पक्षाला मिळावी असा त्यांचा आग्रह होता, अशी चर्चा होती. त्यामुळेच त्यांनी अर्ज भरताना हजेरी लावली नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Rajya Sabha Election : अनुभव आणि नव्या चेहऱ्यांचा संगम
या राज्यसभा निवडणुकीत दोन अत्यंत अनुभवी नेत्यांसह अनेक नव्या चेहऱ्यांना संसदेत जाण्याची संधी मिळणार आहे. शरद पवार आणि रामदास आठवले यांच्याकडे प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. तर पार्थ पवार, रामराव वडकुते, माया इवनाते आणि ज्योती वाघमारे हे प्रथमच राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवणार आहेत.
2022 मधील राज्यसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणाला मोठे वळण मिळाले होते. मात्र यावेळी कोणताही मोठा राजकीय संघर्ष न होता ही निवडणूक शांततेत आणि बिनविरोध पार पडली, हेच तिचे विशेष वैशिष्ट्य ठरले आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.