Video: गल्ली ते दिल्ली.. ज्योती वाघमारेंनी उलगडला संघर्ष; एकनाथ शिंंदेंसमोरच डोळ्यात पाणी..
मुंबई : आम्ही 6 भावंडे, त्यात मी मोठी, आई-वडिल अशिक्षित, लहानपणी आई एका मंगलकार्यालयात कामाला जायची, तर वडिल दलित पँथरचे शाखाध्यक्ष होते, असे म्हणत ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी आपल्या बालपणीच्या आणि संघर्षातील काळाच्या आठवणी सांगितल्या. शिक्षण झाल्यानंतर पत्रकार म्हणून नोकरी करतानाचे अनुभव, सामाजिक, राजकीय चळवळीतील आणि शिवसेना (Shivsena) पक्षातील प्रवेशापासून ते खासदारकीपर्यंतचा प्रवास त्यांनी माझा कट्ट्यावर उलगडला. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातील 7 राज्यसभा खासदारांची बिनविरोध निवड झाली. त्यात, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सोलापूरच्या (Solapur) ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी साध्या नगरसेवकही नसलेल्या ज्योती वाघमारेंना थेट राज्यसभा मिळाल्याने राज्यात या निवडीची चर्चा झाली. त्याच, अनुषंगाने आज माझा कट्टावर बोलताना त्यांनी बालपण, संघर्ष, चळवळ आणि राज्यसभापर्यंतचा प्रवास सांगितला.
ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेची खासदारकी कशी मिळाली याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. सध्याच्या काळात महापालिकेची, ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणंही सर्वसामान्यांसाठी किती अवघड झालं आहे. मात्र, थेट राज्यसभा, तीही मागितली नसताना मला देण्यात आली. जेव्हा मला सांगितलं आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवतोय, डोळ्यात पाणी आलं, रडू लागले, काय बोलावं समजत नव्हतं. मी भावनिक झाले, तेव्हा आता रडायचं नाही तर तुम्हाला लढायचंय असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं, तो प्रसंग ज्योती वाघमारे यांनी एबीपीच्या माझा कट्टामध्ये उलगडला. माझ्या फॉर्ममध्ये सूचक म्हणून पहिली सही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, ही राज्यसभा खासदारकीपेक्षा जास्त आनंद देणारी गोष्ट माझ्यासाठी आहे. मला आपल्या बहिणीसारखं, लेकीसारखं त्यांनी स्वत: माझ्यासोबत येऊन फॉर्म भरला याचाही आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यसभेसाठी कागदपत्रे घेतल्याचं माहिती नव्हतं
राज्यसभेसाठी खासदारकीचा अर्ज भरण्याच्या 4-5 दिवस आधी माझ्याकडून काही कागदपत्रे घेण्यात आली होती. लाडक्या बहिणी योजनेच्या समितीबाबत ही कागदपत्रे मागून घेतल्याचं मला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे, राज्यसभेसाठी आपल्याकडून कागदं घेतली जात आहेत, हे मला माहिती नव्हतं. कारण, राज्यसभा हे खूप मोठं पद आहे, आणि या पदाची संधी आपल्याला मिळेल असं वाटत नव्हतं, असं सत्य खासदार ज्योती वाघमारे यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. राजकारण, समाजकारणाचे यापूर्वीचे अनुभव वेगळे आले आहेत, दुसऱ्या पक्षातलेही आहेत. अनेकदा तुमची पात्रता असून, मागूनही तुम्हाला पद मिळत नाही. मात्र, शिवसेनेत न मागता मला सर्वकाही मिळत गेलं. खासदारकीसाठी ज्यांची नावं चर्चेत होती, त्यांचं प्रत्येकाचं शिवसेनेसाठी योगदान आहे, त्या सर्वांचा मी आदरच करते, असे म्हणत आपल्या राज्यसभा खासदारकीच्या नाव निश्चितीचा अनुभव ज्योती वाघमारे यांनी उलगडला.
हेही वाचा
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
आणखी वाचा
Comments are closed.