म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडा लॉटरी 2026 मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला 30 मार्च, 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपासून प्रारंभ होणार आहे. या सोडतीची जाहिरात दि. 30 मार्च, 2026 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून सदनिका सोडत प्रक्रियेबाबत माहिती देणारी पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2640 सदनिका सोडत
अत्यल्प उत्पन्न गट: 145 सदनिका
अल्प उत्पन्न गट : 858 सदनिका
मध्यम उत्पन्न गट:1408 सदनिका
उच्च उत्पन्न गट : 229 सदनिका
सदनिकांच्या विक्रीचं सोडत वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा : 30 मार्च, 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपासून प्रारंभ
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत : 29 एप्रिल, 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत
ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती : 30 एप्रिल, 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत
सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी जाहीर करणे : 05 मे, 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत
प्रारुप यादीवर ऑनलाईन दावे व हरकती : 08 मे, 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत मुदत
अंतिम यादीची प्रसिद्धी : 12 मे, 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत जाहीर होणार
दि. 15 मे,2026 रोजी सकाळी 11.00 वाजता सोडत काढली जाणार
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
अर्जदारांना नोंदणीसाठी व अर्ज भरण्यासाठी मोबाईल क्रमांक (आधार क्रमांकाशी संलग्न) व ई-मेल आय.डी. आवश्यक आहे. अर्जदारांना नोंदणीसाठी व पात्रतेसाठी
१) आधार कार्ड,
2) पॅन कार्ड,
3) अर्जदाराने जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून मागील सलग २० वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदारांचे किमान १५ वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (Domicile Certificate),
4) उत्पन्नाचा पुरावा म्हणून दि. 01.04.2024 ते 31.03.2025 (उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र अथवा तहसिलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला ग्राहय धरला जाईल) आवश्यक आहे.
उत्पन्न गट आणि आर्थिक उत्पन्न
अत्यल्प उत्पन्न गट : 6 लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न
अल्प उत्पन्न गट : 9 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न
मध्यम उत्पन्न गट: 12लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न
उच्च उत्पन्न गट : 12 लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणारे, कमाल उत्पन्न मर्यादा नाही
महत्त्वाची बाब : अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे, अर्जदाराचे स्वतःचे व त्यांची पत्नी/पती यांचे दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून, जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न होय. दिनांक 01.04.2024 ते 31.03.2025 या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरुन आयकर विवरण पत्र (Financial Year 2024-2025 & Assessment Year 2025-2026) अथवा तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे.
या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरुपाचा उत्पन्न स्तोत्राबाबतची कागदपत्रे दाखले /पुरावे/ प्रतिज्ञापत्र / वेतन प्रमाणपत्र इ. संगणकीय प्रणालीव्दारे ग्राह्य धरली जाणार नाही /Capture केली जाणार नाही, याची विशेष नोंद घ्यावी. अर्जदार पती/पत्नी दोघांचे उत्पन्न असल्यास working Status both असे निवडून दोघांचे उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे. याअनुषंगाने संगणकीय प्रणालीलमध्ये आवश्यक ते पुरावे upload करावेत. अर्ज सादर करतांना उत्पन्नाचे पुरावे चुकीचे किंवा दोघांचे उत्पन्न असतांना देखील एकाचे उत्पन्न दाखवल्याचे निदर्शनास आल्यास अर्जदाराचे सदनिका वितरण कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल व अर्जदाराने भरलेली सर्व रक्कम समपहरण करुन सदनिका मंडळाच्या ताब्यात घेवून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास मुंबई मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.