लोकलमध्ये मराठीला प्रवेशबंदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य रेल्वेच्या ताफ्यात सोमवारी स्वयंचलित दरवाजांची नॉन-एसी लोकल दाखल झाली. अपघातांचे सत्र थांबवण्यासाठी नव्या लोकलचे स्वागत होत असतानाच लोकलमधील अंतर्गत बदल चर्चेचा विषय बनले आहेत. विविध बदल करताना रेल्वे प्रशासनाने गाडीच्या अंतर्गत भागात सूचना लिहिण्यासाठी मराठी भाषेचा वापर टाळल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ट्रेनमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर केला असून मराठी भाषेचा वापर केवळ डब्यांची ओळख स्पष्ट करण्यासाठी दरवाजाबाहेर केला आहे. यातून मध्य रेल्वेचा मराठीद्वेष कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वयंचलित दरवाजांची नॉन-एसी लोकल चेन्नईतील ‘आयसीएफ’ फॅक्टरीमध्ये तयार करून कुर्ला कारशेडमध्ये आणण्यात आली. केंद्र सरकारच्या धोरणानुसार लोकल ट्रेनमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांचा वापर करणे आवश्यक होते. मात्र नव्या लोकलच्या अंतर्गत भागातील विविध सूचना केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतून लिहिल्या आहेत. मराठी भाषेचा वापर केवळ दरवाजाबाहेरील भागात त्या-त्या डब्याची ओळख दाखवण्यासाठी केला आहे. अलीकडेच झालेल्या ट्रेन महोत्सवातही मध्य रेल्वेने मराठी डावलली होती. तसेच रेल्वेच्या कामकाजात हिंदी आणि इंग्रजी भाषेतून सर्व माहिती देण्याचे आदेश विभागीय राजभाषा समितीने दिले होते. रेल्वेच्या या वाढत्या मराठीद्वेषामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून मराठी भाषाप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.

मराठीच्या किरकोळ वापरातही अनेक चुका

नव्या लोकलच्या दाराबाहेरील मराठीच्या किरकोळ वापरात रेल्वे प्रशासनाने अनेक चुका केल्या आहेत. ‘सकाळी’ऐवजी ‘सकाली’, महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यावर ‘24 तास फक्त स्त्रियांसाठी’ ऐवजी ‘24 चौबीस तास फकतक्त स्त्रियांसाठी’ असे लिहिले आहे. मराठीच्या ओळीत हिंदीचे शब्द घुसवले आहेत. रेल्वे प्रशासन मराठी भाषेचा सन्मानपूर्वक वापर करीत नसल्याचे यातून उघड झाले आहे.

रेल्वे प्रशासनाचा मराठीद्वेष नेहमीच दिसत आहे. रेल्वे प्रशासनाने आपण महाराष्ट्रात प्रवासी सेवा देत आहोत याचे भान ठेवावे आणि सर्वच ठिकाणी मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करावा. नव्या लोकलमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करताना मराठी डावलली ही बाब निश्चितच निषेधार्ह आहे. अशा गोष्टींकडे मराठी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. ते अधिकारी केवळ खुर्च्या गरम करण्यासाठी नाहीत. – गोवर्धन देशमुख, अध्यक्ष, मराठी एकीकरण समिती

हिंदी आणि इंग्लिश

बाह्य भागात प्रथम श्रेणी डबा, महिलांसाठी राखीव डबा आदी उल्लेख करताना हिंदी, इंग्रजीसोबत मराठीचा वापर केला आहे. अंतर्गत भागात मोठय़ा प्रमाणावर सूचना असून त्या लिहिताना मराठी भाषा जाणूनबुजून टाळली गेली आहे.

Comments are closed.