CSK vs KKR: पराभवानंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा! ‘या’ कारणामुळे सामना हातातून गेला?
यंदाच्या आयपीएलमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी कायम राखत, चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सचा 32 धावांनी पराभव करून आपला सलग दुसरा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना, चेन्नईने 192/5 अशी एक भक्कम धावसंख्या उभारली. याला प्रत्युत्तर देताना, केकेआरच्या संघाला 7 विकेटच्या मोबदल्यात केवळ 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईच्या या विजयाचा शिल्पकार ठरला नूर अहमद, ज्याने आपल्या 4 षटकांत केवळ 21 धावा देत 3 बळी मिळवले. त्याने कोलकाताच्या फलंदाजीची कंबरच मोडून काढली. जरी रोव्हमन पॉवेल (31*) आणि रमणदीप सिंग (35) यांनी 63 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला असला, तरी अखेरीस त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले.
सामन्याच्या सुरुवातीला, संजू सॅमसन (48) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (41) यांनी चेन्नईसाठी महत्त्वपूर्ण खेळी केल्या, तर आयुष म्हात्रेने अवघ्या 17 चेंडूंत 38 धावा कुटत संघाला एक स्फोटक सुरुवात करून दिली. केकेआरकडून, कार्तिक त्यागीने 2 विकेट मिळवले.
दरम्यान, पराभवानंतर कोलकाता संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने संयमित प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की, गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि या विकेटवर 190 धावा रोखणे हे सकारात्मक होते. मात्र, फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. पॉवरप्लेमध्ये केवळ 36-37 धावा झाल्याने संघावर दबाव वाढला.
रहाणे पुढे म्हणाला की, संघाला असा फलंदाज हवा होता जो शेवटपर्यंत टिकून राहिला असता. संयोजनाच्या दृष्टीने संघ चांगला आहे, पण विजय न मिळाल्यास बदलांचा विचार करावा लागतो. कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीचेही त्याने कौतुक केले. तसेच दोन्ही संघांच्या फिरकी गोलंदाजांनी प्रभावी मारा केल्याचेही त्याने नमूद केले. सकारात्मक राहून आत्मविश्वास टिकवणे गरजेचे असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
Comments are closed.