धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
नागपूर क्राईम न्यूज : नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जादुमहाल परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. सागर सलामे असं या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कदायक म्हणजे हत्येच्या आरोपात अटकेत असलेले सर्व 11आरोपी हे अल्पवयीन आहेत.
काही दिवसाआधी आरोपींचा मृत सागर सलामे या तरुणासोबत वाद झाला होता
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसाआधी आरोपींचा मृत सागर सलामे या तरुणासोबत वाद झाला होता. मृतक अजनी हद्दीत आल्याची माहिती मिळताच आरोपीने धारधार शास्त्राने हल्ला करत सागर सलामेची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपींना काही तासात अटक केली आहे.
नागपूर शहरातील कलमना परिसरात पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला
नागपूर शहरातील कलमना परिसरात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करून आरोपींनी पोलीसांची बुलेट मोटरसायकल लुटून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी सुमारे साडेआठ वाजताच्या सुमारास कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिप्टी सिग्नल परिसरात ही घटना घडली. PSI सचिन वाकलेकर हे आपल्या होमगार्डसह नियमित गस्त घालत होते. त्यावेळी दोन व्यक्तींनी एका संशयित व्यक्तीबाबत माहिती दिली. माहितीच्या आधारे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता अचानक दोन आरोपी दुचाकीवरून आले. त्यापैकी एकाने चाकू काढून PSI वाकलेकर यांच्यावर सपासप वार केले. पहिला वार त्यांच्या खांद्यावर लागला, तर दुसरा वार करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले
हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही PSI सचिन वाकलेकर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी पोलीसांची बुलेट मोटरसायकल हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली. जखमी PSI यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन तपासाला वेग दिला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख महेंद्र उर्फ मयंक उईके, धर्मेंद्र सयाम आणि सोनू उर्फ मरस कोल्हे अशी असून ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.