यंदा फक्त आंब्याचे २० टक्केच उत्पादन, हा मेळावा म्हणजे शेतकऱ्यांच्या आक्रोश – माजी आमदार बाळ माने
बोगस किटकनाशक औषधे,निकृष्ट खते आणि हवामानातील बदलामुळे यंदा फक्त आंब्याचे वीस टक्के उत्पादन झाले आहे. त्यामुळे सरकारने आंबा बागायतदारांना आर्थिक मदत करावी यामागणीसाठी आम्ही उद्या शनिवारी रत्नागिरीत आंबा बागायतदारांचा मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा कोणतेही शक्तीप्रदर्शन नसून हा आंबा बागायतदारांचा आक्रोश आहे. त्यांच्या व्यथा मांडणारा हा मेळावा आहे असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या वेळी माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले की, कोकणातील आंबा-काजू बागायतदार शेतकरी आणि मच्छिमार हा यंदा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्च महिन्यापासून शेतकरी आणि मच्छिमार आंदोलन करत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन सुरू झाले आहे. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादके विक्रेते सहकारी संस्था आणि रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघ यांच्या वतीने उद्या दिनांक १८ एप्रिल रोजी रत्नागिरीतील बालाजी मंगल कार्यालयात आंबा-काजू शेतकरी आणि मच्छिमार यांचा मेळावा आयोजित केला आहे.
या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत मार्गदर्शन करणार आहेत. गेली १५ वर्ष येथील आंबा -काजू शेतकरी सरकारकडे नुकसान भरपाई,सवलती मागत आहेत मात्र सरकारने कायम दुर्लक्ष केले असून उद्याच्या मेळाव्यात यासर्व बागायतदारांची एकजूट करून त्यांचा पुढील लढा उभारला जाणार आहे. गेल्या ५० वर्षात कोकणातील आंबा बागायतदारांना सरकारने मदत केलेली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. यावेळी कोकण हापूस उत्पादक व उत्पादके विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश पाटील, उपतालुकाप्रमुख विजय देसाई आणि युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत उपस्थित होते.
आंबा-काजूसाठी एकही किटकनाशक औषध नाही
आंबा आणि काजू फळपीकांवरील रोगनियंत्रण करणारे कोणतेही किटकनाशक औषध नाही.राज्यातील अन्य पीकांवर जी औषधे फवारली जातात तीच औषधे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना विकली जातात.यंदा औषध फवारणी करूनही मोहर धरलाच नाही.खते घालूनही उत्पादन आले नाही.त्याचबरोबर अनेक बोगस किटकनाशक औषधे आणि निकृष्ट खते बाजारात विकून आंबा व काजू बागायतदारांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप माजी आमदार बाळ माने यांनी केला आहे.
प्रत्येक झाडाला पाच हजार रूपये मदत द्या
एका आंबा कलमाला खते,औषधे,मनुष्यबळ आणि देखभालीचा सुमारे तीन हजार रूपये खर्च येतो त्यामुळे सरकारने आंबा-काजूला हेक्टरी तुटपुंजी मदत जाहीर न करता प्रत्येक कलमाला पाच हजार रूपये अशी लाडका आंबा मदत योजना जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळ माने यांनी केली.
Comments are closed.