हनुमानाच्या उपासनेचा तिरस्कार
भारतातील प्रत्येक प्राचीन ग्रामाची एक वैशिष्ट्यापूर्ण परंपरा असतेच याची आपल्याला कल्पना आहे. वास्तविक भगवान हनुमान हे साऱ्या भारतासाठी पूजनीय दैवत आहे. भारतात भगवान शंकर, भगवान श्रीकृष्ण, भगवान राम यांच्याइतकेच महत्वाचे दैवत म्हणून हनुमानाला मानले जाते. भारतात सर्वत्र या देवतेची मंदिरे आहेत. खरे पाहता, भारत हा आस्था आणि भक्तीचा देश आहे. तथापि, याला अपवाद असणारी काही स्थानेही असून ती नेहमीच चर्चेचा विषय असतात.
हिमालय पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या ‘द्रोणागिरी“ नामक ग्रामात हनुमानाची पूजा केली जात नाही. इतकेच नव्हे, तर कोणी हनुमानाचे नाव जरी काढले, तरी त्याला गावातून पळवून लावण्यात येते. सहस्रावधी वर्षांपासून ही परंपरा असून रामायणातील एक प्रसंग या परंपरेच्या मुळाशी आहे, असे मानले जाते. भगवान राम आणि रावण यांच्या युद्धात रामांचा प्राणप्रिय बंधू लक्ष्मण घायाळ होऊन बेशुद्ध पडतो. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावरील विशिष्ट वनस्पती आणा, अशी सूचना वैद्य करतात. भगवान राम हे काम हनुमानावर सोपवितात. हनुमान आकाशमार्गे प्रवास करुन द्रोणागिरी पर्वतावर पोहचतात. पण नेमकी वनस्पती ते ओळखू शकत नाहीत. त्यामुळे संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच ते उचलतात आणि युद्धभूमीवर आणतात. अशा प्रकारे लक्ष्मणाच्या प्राणावरचे संकट दूर होते, असा हा रामायणातील प्रसंग आहे. हा प्रसंगच या ‘द्रोणागिरी“ नामक ग्रामात असणाऱ्या हनुमानावरच्या रागाचे कारण आहे, असे मानले जाते. कारण भगवान हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलताना या द्रोणागिरी नामक गावाची ग्रामदेवता ‘लाटू“ हिची अनुमती घेतली नव्हती. तेव्हापासून या ग्रामातील लोक भगवान हनुमानावर व्रुद्ध आहेत. हा त्यांचा राग आजही आहे, आणि त्यातूनच ही परंपरा जन्मली आहे.
Comments are closed.