स्टेशनवरून जाताना ट्रेनमध्ये अंधार.

भारतातील रेल्वे जाळे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक आहे. प्रतिदिन हजारे रेल्वेगाड्या भारतातील सहस्रावधी रेल्वे स्थानकांवरुन जा-ये करीत असतात. तामिळनाडू राज्याची राजधानी चेन्नईमध्ये असणारे ताम्बरम हे रेल्वे स्थानक एका वेगळ्याच वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. या स्थानकावरुन कोणतीही स्थानिक रेल्वे गेली, की काही काळ त्या गाडीतील दिवे बंद होतात आणि गाडी अंधारात बुडून जाते. असे काही क्षण गेल्यानंतर गाडीतील देवे परत लागतात आणि ती पुन्हा पूर्ववत प्रकाशमान होते. असे प्रत्येक गाडीच्या संदर्भात होते. कित्येक प्रवाशांना हा एक चमत्कार वाटतो. तसेच गाडीत अंधार झाला की त्यांच्या मनात भीतीची भावना उत्पन्न होते. विशेषत: जे प्रवासी प्रथमच या स्थानकावरुन जातात त्यांची तर भीतीने गाळण उडते. असा अंधार का होतो, त्याचे कारण प्रवाशांच्या मनातील कारणापेक्षा पूर्णपणे भिन्न आणि शास्त्रीय आहे.

ही अंधार होण्याची समस्या केवळ स्थानिक रेल्वेमध्येच उद्भवते. वेगवान किंवा अतिवेगवान गाड्या या स्थानकासमोरुन जातात तेव्हा ही समस्या येत नाही. अशा गाड्यांमधील दिवे बंद होत नाहीत. केवळ स्थानिक गाड्यांसंदर्भातच (लोकल ट्रेन) हा विचित्र प्रकार घडतो. याचे कारण भुताटकी किंवा तत्सम नसून शास्त्रीय आहे. स्थानिक गाड्यांना ज्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन (ओईएल) मधून वीज पुरवठा होत असतो, त्या लाईनच्या विशिष्ट भागातून वीज पुरवठा होत नाही. हा वीज नसलेला भाग नेमका या स्थानकाच्या जवळचा आहे. त्यामुळे या स्थानकानजीक आल्यानंतर स्थानिक गाडी एका इलेक्ट्रिक झोनमधून दुसऱ्या इलेक्ट्रिक झोनमध्ये प्रवेश करते, तेव्हा काही क्षण संपूर्ण गाडीतील वीज प्रवास खंडित होतो आणि गाडीत अंधाराचे साम्राज्य पसरते. मग हा प्रकार स्थानिक गाड्यांमध्येच का घडतो आणि इतर जलद किंवा अतिजलद गाड्यांमध्ये का घडत नाही, हा प्रश्न निर्माण होते. त्याचे उत्तर असे आहे, की अशा गाड्या जेव्हा या स्थानकापाशी येतात, तेव्हा त्या अपोआप इलेक्ट्रिक मोडवरुन डिझेलमोडमध्ये जातात. त्यामुळे गाडीतील  वीजपुरवठा खंडित होत नाही. स्थानिक गाड्या पूर्णपणे वीजवरच्या असल्याने त्या डिझेलमोडमध्ये जात नाहीत. परिणामी, वीजपुरवठा बंद पडला की काही काळ गाडीत अंधार होतो. तथापि, हे कारण बहुतेकांना माहीत नसते. म्हणून कित्येकांना हा भुताटकीचा प्रकार वाटतो आणि ते घाबरुन जातात, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Comments are closed.