VIDEO: एलएसजी विरुद्ध शशांकची ढिसाळ फिल्डिंग पाहून अर्शदीप-पॉटींग संतापले, कॅप्टन अय्यरची रिऍक्शन एकदा पाहाच

आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (१९ एप्रिल) पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ भिडले. मुल्लाणपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना मोठ्या धावसंख्येचा झाला. यामध्ये पंजाबने लखनऊचा ५४ धावांनी पराभव केला, मात्र त्यांचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटींग काहिसे निराश दिसले. या विजयानंतर पंजाबने गुणतालिकेत त्यांचे स्थान अव्वल क्रमांकावर आणरी मजबूत केले आहे. असे असले तरी लखनऊ विरुद्ध शशांक सिंगने केलेल्या क्षेत्ररक्षणाच्या चुकांमुळे पॉटींग आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग चिडलेले दिसले. शशांकने एक नाही तर अनेक झेल सोडले.

शंशाकने १४ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर निकलस पूरनचा सोपा झेल सोडला. युझवेंद्र चहलने ते षटक टाकले होते. १८ व्या षटकातही त्याने त्याची कामगिरी सुधारली नाही. जेव्हा एडन मार्करमने मारलेला शॉट ओळखण्यात तो चुकला आणि चेंडू सीमारेषेपार षटकार गेला. त्याचे हे ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहून डगआऊटमध्ये बसलेला पॉटींगचही थक्क झाला.

१९ व्या षटकातही शशांकने मुकुल चौधरीचा झेल सोडला. तेव्हा तर त्याने दोन्ही हातांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. हे पाहून कर्णधार श्रेयस अय्यर हसला, तर पॉटींगच्या चेहऱ्यावर त्याने केलेल्या त्याच-त्याच चुकांमुळे गंभीर हावभाव दिसत होते. सामना संपताच तो तणाव काहीसा निवळलेला दिसला. खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत असताना श्रेयसने शशांकचा चेहरा कॅपने लपवला. तसेच पॉटींगने शशांकला हसत मिठी मारली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी केली. प्रियांश आर्याच्या ९३ धावा आणि कूपर कॉनोलीच्या ८७ धावांच्या जोरावर पंजाबने २० षटकात ७ विकेट्स गमावत २५४ धावसंख्या उभारली होती. यामध्ये लखनऊच्या प्रिन्स यादव आणि मनिमारण सिद्धार्थ यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. प्रिन्सची गोलंदाजी सर्वाधिक प्रभावी ठरली. त्याने ४ षटकात केवळ २५ धावा दिल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ २० षटकात ५ विकेट्स गमावत २०० धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामध्ये मिचेल मार्शच्या ४० धावा, कर्णधार रिषभ पंतच्या ४३ धावा आणि मार्करमच्या ४२ धावांचा समावेश आहे. पंजाबकडून सर्वाधिक विकेट्स मार्को यान्सेनने घेतल्या. त्याने ४ षटकात ३७ धावा देत पूरन आणि मार्करमला बाद केले.

Comments are closed.