2027 वर्ल्ड कपसाठी रोहित-विराटची वाट खडतर! बीसीसीआयचा 'हा' निर्णय दोघांच्या अडचणी वाढवणार?
विराट कोहली (Virat Kohli and Rohit Sharma) आणि रोहित शर्मा आता त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. दोघांनीही टी-20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, आता ते फक्त वनडे (एकदिवसीय) सामन्यांमध्ये खेळताना दिसत आहेत. 2027 चा वनडे वर्ल्ड कप जिंकणे हेच आता या दोघांचे मुख्य लक्ष्य आहे. मात्र, बीसीसीआयच्या (BCCI) एका निर्णयामुळे या मोठ्या स्पर्धेपर्यंतचा त्यांचा प्रवास कठीण होऊ शकतो. बीसीसीआयने अजित आगरकर यांना 2027 पर्यंत मुख्य निवडकर्ता (Chief Selector) पदावर कायम ठेवण्याचा विचार केला आहे.
अजित आगरकर यांचा टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता म्हणून कार्यकाळ जून 2026 पर्यंत होता. मात्र, ‘एक्सप्रेस स्पोर्ट्स’च्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय आगरकर यांच्या आतापर्यंतच्या कामावर खूप खूश आहे आणि म्हणूनच त्यांचा करार एका वर्षासाठी वाढवला जाणार आहे. याचा अर्थ असा की, ते जून 2027 पर्यंत या पदावर राहतील. अजित आगरकर यांच्या कार्यकाळात विराट आणि रोहितसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत पराभव झाल्यानंतर या दोघांवर कसोटीत चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढला होता. त्यानंतर सर्वांना धक्का देत त्यांनी या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. आगरकर यांच्या नेतृत्वाखाली आता कसोटी संघात मोठे बदल होत आहेत. टी-20 मध्येही भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलण्यात (ट्रांजिशन) आगरकर यांना मोठे यश मिळाले आहे.
आता वनडे संघातही असेच बदल होताना दिसत आहेत. रोहित आणि विराट हे वनडे क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू असले, तरी रिपोर्टनुसार आता केवळ कामगिरी (Performance) याच आधारावर त्यांना संघात स्थान मिळेल. याशिवाय, फिट राहण्यासाठी प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट (Domestic Cricket) खेळावेच लागेल, असा निर्णय आगरकर आणि मॅनेजमेंटने घेतला आहे. विराट आणि रोहितने आतापर्यंत ही आव्हाने पेलली आहेत, पण 2027 पर्यंत संघात टिकून राहण्यासाठी त्यांना सतत चांगली कामगिरी करत राहावी लागेल.
Comments are closed.