सीएसकेला मोठा धक्का, आयुष म्हात्रे आयपीएल 2026च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर

आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला हंगामाआधीच दुखापतीने घेरले आहे. त्यांच्या संघामधून आतापर्यंत दोन खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर झाले असून आता आयुष म्हात्रेही त्यांच्या यादीत जोडला गेला आहे. तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२६ च्या उर्वरित सामन्यांमधून संघाबाहेर झाला आहे. त्यामुळे तो सीएसकेचा या हंगामातून बाहेर होणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

सीएसके फ्रॅंचायजीने मंगळवारी (२१ एप्रिल) एक निवेदन सादर केले, ज्यामध्ये त्यांनी आयुषच्या दुखापतीबाबत माहिती दिली. तसेच त्याला त्यातून सावरण्यासाठी किमान सहा ते बारा आठवड्यांचा पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) कालावधी लागेल असेही नमूद केले आहे. त्यांच्या या अधिकृत माहितीने आयुषची या हंगामातील मोहिम समाप्त झाल्याचे स्पष्ट होते.

आयुषला सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध (एप्रिल १८) डाव्या पायाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्या सामन्यात या १८ वर्षीय खेळाडूने १३ चेंडूत ३० धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने प्रफुल हिंगेच्या एका षटकात २४ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने दुखापत झाली असतानाही फलंदाजी सुरूच ठेवली होती. तो सीएसकेचा या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा महत्त्वाचा खेळाडू आहे. आता तोच संघाबाहेर झाल्याने पाच वेळेचा विजेत्या संघाची चिंता वाढली आहे.

आयुष दुखापतीआधी जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने जवळपास १८० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. त्याने ६ सामन्यांत १७७.८८ च्या स्ट्राईक रेटने २०१ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे.

आयुषच्या आधी वेगवान गोलंदाज खलील अहमद हा पण मांडीच्या स्नायूच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तसेच नॅथन एलिस हा आधीच संघाबाहेर होता. आयपीएलमध्ये सीएसकेने आतापर्यंत ६ सामने खेळले असून त्यामध्ये दोन विजय मिळवले आहे. हा हंगाम अजून बराच मोठा असून संघाला त्वरित बदली खेळाडू शोधावे लागणार आहेत.

त्याचबरोबर धोनी आणि स्पेन्सरने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. तर डेवाल्ड ब्रेविस पहिल्या काही सामन्यांना मुकला होता. आता तो संघात परतला आहे.

Comments are closed.