सौदीतून सायबर खंडणी प्रकरण उघड, खेड पोलिसांची मोठी कारवाई; आरोपीला मुंबईत अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सायबर माध्यमातून अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ६८ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अटक करत मोठे यश मिळवले आहे. सौदी अरेबियात वास्तव्यास असलेला आरोपी मुंबईत आल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६(E) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी महिलेची फसवणूक करून आरोपी गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (वय ३२, रा. साखरोली, ता. खेड, जि. रत्नागिरी) याने तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिचे खासगी फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार पैशांची मागणी केली.

सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने ऑनलाइन माध्यमातून तब्बल ६८ लाख रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एवढे पैसे दिल्यानंतरही आरोपीने आणखी पैशांची मागणी सुरू ठेवली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने फिर्यादीचे अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपी जानेवारी २०२६ पासून सौदी अरेबियात नोकरीस होता. मात्र, १८ एप्रिल २०२६ रोजी तो मुंबईत आल्याची माहिती मिळताच खेड पोलिसांच्या पथकाने त्याचा मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेत सापळा रचला आणि पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून सुमारे ७ लाख रुपये किमतीची चारचाकी, ४० हजार रुपये किमतीचा आयफोन, ३० हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा मोबाईल तसेच पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला २३ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहीरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सायबर फसवणूक व ब्लॅकमेलिंगसारख्या गुन्ह्यांपासून सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

Comments are closed.