शिवसेनेचा दणका! महानगरपालिकेने निकृष्ट खिचडी पुरवठादाराला हटवले!! विरोधी पक्षनेत्यांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये उघड झाल्या होत्या गंभीर त्रुटी
मुंबई महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत देण्यात येणारी खिचडी अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या ‘सरप्राईज व्हिजिट’मध्ये हा संतापजनक प्रकार उघड झाल्यानंतर पालिकेने तातडीने आज संबंधित खिचडी पुरठादार कंत्राटदाराला हटवून पौष्टिक व स्वच्छ मध्यान्ह भोजन पुरवठ्यासाठी ‘अक्षय चैतन्य’ आणि ‘अक्षय पात्र’ अशा दोन संस्थांची निवड केली आहे.
निकृष्ट अन्नपुरवठ्याबाबत तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी वांद्र्याच्या खेरनगर महापालिका इंग्रजी माध्यम शाळा क्र. 2 मधील शाळेत ‘सरप्राईज व्हिजिट’ करून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया खिचडीची तपासणी केली. ही खिचडी अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनास आले. निकृष्ट खिचडी पुरवठ्याबाबत तक्रारी येऊनही पालिका प्रशासन किंवा महापौर रितू तावडे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी यावेळी केला. यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आदी उपस्थित होते.
अपुरे शिक्षक, सुविधांची बोंब
या शाळेत शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षकदेखील नसून इतर अत्यावश्यक सुविधांचीही बोंब असल्याचे सरप्राईज व्हिजिटमधून समोर आले आहे. याची तातडीने दखल घेऊन उपाययोजना केल्या नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही पेडणेकर यांनी दिला.
स्थायी समिती अध्यक्षांना ‘शून्य किंमत’
पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आहेत. मात्र त्यांच्या अधिकारक्षेत्रात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा प्रचंड हस्तक्षेप सुरू आहे. सर्व निर्णय साटम यांच्या निर्देशानुसार घेण्याचा दबाव स्थायी समिती अध्यक्ष शिंदे यांच्यावर टाकला जातो. स्थायी समिती अध्यक्षांना पालिकेत ‘शून्य किंमत’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Comments are closed.