थोडक्यात – बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा
वांद्रे परिसरात वैद्यकीय पदवी नसतानादेखील एक डॉक्टर रुग्णावर उपचार करत असल्याची तक्रार पालिकेतील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांनी केली. या माहितीनंतर गुन्हे शाखा युनिट 9च्या पथकाने बनावट ग्राहक त्या डॉक्टरच्या दवाखान्यात पाठवला. पोलिसांनी त्या तोतया डॉक्टरकडे चौकशी केली असता त्याच्याकडे पदवी आणि वैद्यक परिषदेत नोंद नसल्याचे आढळून आले. तो तोतया गेल्या पाच वर्षांपासून स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवत होता. त्या दवाखान्यातून काही औषधे पोलिसांनी जप्त केली असून दोन जणांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पैशांच्या वादातून हत्या
गुंतवणूक केलेल्या पैशांवर महिन्याला द्यावयाचे पैसे वेळेवर देत नसल्याने झालेल्या वादातून नागपाडा येथे एका 75 वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याची घटना घडली.याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिक जावर (35) असे आरोपीचे नाव आहे. मोहम्मद इक्बाल सेलिया (75) यांनी जावरकडे 65 लाख रुपये गुंतवले होते. या गुंतवणुकीवर सेलिया यांना महिन्याला पैसे मिळणार होते. परंतु ते पैसे मिळण्यास उशीर होत असल्याने दोन दिवसांपूर्वी सेलिया आणि जावर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी संतापलेल्या जावरने सेलिया यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. मान, छाती, पोट आणि दोन्ही हातांवर गंभीर वार झाल्याने त्यातच सेलिया यांचा मृत्यू झाला.
अभिनेत्याच्या घरी चोरी
छोटय़ा पडद्यावर काम करणाऱया अभिनेत्याच्या घरी मोलकरणीने डल्ला मारल्याची घटना घडली आहे. सोन्याचे दागिने आणि परदेशी चलन असे 7 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी मोलकरणीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. 6 एप्रिलला एक महिला त्याच्याकडे घरकामासाठी आली. ती यापूर्वी चार वेळा कामासाठी तक्रारदार यांच्या घरी आली होती. कामावर आल्यावर ती रूममध्ये साफसफाई करण्यास गेली. तिने रूमचे दार आतून बंद केले होते. 15 मिनिटांनंतर ती काम संपवून निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्यांनी कपाटातील ड्रॉवर उघडले. तेव्हा कपाटातून सोन्याचे दागिने आणि परदेशी चलन गायब झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मोलकरणीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
बँक अधिकाऱ्याची फसवणूक
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली एका खासगी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची 97 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलिसांनी पाचजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांना मोबाईलवर एक लिंक आली. त्या लिंकनंतर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. लिंकवर क्लिक केल्यावर एक अॅप डाऊनलोड झाले. कंपनीचे शेअर घेतल्यावर अधिक नफा होईल असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून त्याने शेअर खरेदीचा निर्णय घेतला. गुंतवणुकीवर नफा झाल्याने त्याने ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे निघत नव्हते. ग्रुप अॅडमिनने काहीच प्रतिसाद दिला नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Comments are closed.