भाजप डिलीमिटेशनवर का बोलत नाही? मुंबई व महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा फडणवीसांचा डाव – हर्षवर्धन सपकाळ
भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. भाजपची विचारसणी ही गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट तसेच मनुस्मृतीवर आधारीत आहे. यामध्ये महिलांना अतिशुद्र समजले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा स्विकार करणाऱ्या मनुवादी विचाराच्या पक्षाने आधी बंच ऑफ थॉट व मनुस्मृतीची होळी करावी आणि मगच महिला आक्षणावर बोलावे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक पदावर महिलेची नियुक्ती करून दाखवा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. तसेच मुंबई व महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा भाजपा व देवेंद्र फडणवीसांचा डाव असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मुंबईत टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महिला आरक्षणावर बोलताना भाजपने महिलांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन कोणता ते स्पष्ट करावे. सावित्रिबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्यावेळी त्यांच्यावर शेणाचे गोळे मारणारे कोण होते. हे भाजपने सांगावे. सावित्रीबाईंचा या तथाकथीत धर्ममांर्तंडांनी छळ केला, त्यामुळे महिलांबद्दल भाजप दाखवत असलेला पुळका सर्वांना माहित आहे.
ते म्हणाले की, संसदेत महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच सर्व पक्षांच्या पाठिंब्याने मंजूर झालेले आहे. १६ एप्रिलला जे विधेयक लोकसभेत मांडले होते ते डिलिमिटेशनचे होते. या विधेयकाआडून भाजपला देशाचे तुकडे करायचे होते. तर मुंबई व महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा होता. भाजपचे नेते डिलिमिटेशनवर काहीच बोलत नाहीत. भाजपचा हा दुष्ट हेतू इंडिया आघाडीने ओळखला व त्या विधेयकाला विरोध केलेला आहे. भाजपा मात्र विरोधी पक्षांना महिला विरोधी ठरवत आहे. महिलांना सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ३३ टक्के आरक्षण दिले नंतर ते वाढवून ५० टक्के केले. महिला आरक्षणाच्या नावावर राजकारण करण्याचे धंदे भाजपने बंद करावेत, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.
Comments are closed.