आधी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, तुम्हीच लढा; आता सुप्रिया सुळेंनीही विधानपरिषदेसाठी सूचवलं एकच नाव

मुंबई : राज्यातील 10 विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यामध्ये, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. कारण, येथील जागेवर स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमदार होते, त्यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर आता कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता शिवसेनेसह इतरही पक्षातील नेत्यांना आहे. त्यामुळेच, आधी काँग्रेस आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील विधानपरिषदेच्या जागेसाठी एकच नाव सूचवलं, ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचं. खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंनीच विधानपरिषद निवडणूक लढवावी, अशी विनंती केलीय.

महाविकास आघाडी विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सुद्धा उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी यासाठीचा आग्रह धरला आहे. आज हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन काँग्रेसची भूमिका मांडली, काँग्रेसची सुद्धा भूमिका उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विधानपरिषदेवर यावं अशी आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी स्वत: ट्विट देखील केलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणूक लढवावी अशा प्रकारची विनंती एक्स पोस्ट द्वारे केली आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुप्रिया सुळेंची भूमिका (Supriya sule vidhanparishad)

महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. उद्धवजींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती.

उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी स्वागत, पण… (vijay wadettiwar to uddhav Thackeray)

महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लढणार असतील तर त्यांचे स्वागत असेल. पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल. कारण, त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबतही आताच स्पष्टता करावी लागेल. महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी तिन्ही पक्षाच्या समन्वयाने निर्णय घ्यावे लागतील. मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा घडवून आणणे उचित नाही, असे वडेट्टीवार यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार

1. उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)

2. नीलम गोऱ्हे (शिवसेना)

3. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)

4. अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)

5. गोपीचंद पडळकर (भाजप)

6. रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)

7. राजेश राठोड (काँग्रेस)

8. प्रवीण दटके (भाजप)

9. रमेश कराड (भाजप)

10. प्रज्ञा सातव (काँग्रेस, राजीनामा)

28 मतांचा कोटा आवश्यक

दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.

हेही वाचा

Video मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार

आणखी वाचा

Comments are closed.