शैक्षणिक ‘घोडदौड’ इयत्ता नववीतच थांबली, बायकोला गिफ्ट मिळालेल्या पुस्तकाचं शीर्षक बघून संजय गाय
शिवाजी कोन्होटा पुस्तकावर संजय गायकवाड: महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात आदराचे स्थान असणारे पुरोगामी चळवळीतील विचारवंत आणि कम्युनिस्ट कामगार नेते दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या बहुचर्चित ‘शिवाजी कोण होता’ (Shivaji Kon Hota) या पुस्तकाच्या प्रकाशकांना धमकावल्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. संजय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी उल्लेख असणारे पुस्तक तुम्ही प्रकाशितच कसे करु शकता, असा सवाल विचारत प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरुन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण’, ‘त्याची काय अवस्था झाली तुला माहितीये ना’, ‘तुला पण त्याला भेटायला वर जायचं आहे का?’, अशी खालच्या दर्जाची भाषा संजय गायकवाड यांनी वापरली. प्रशांत आंबी यांनी संजय गायकवाडांना हे पुस्तक किमान वाचा, अशी विनंतीही करुन पाहिली. मात्र, ‘मला हे पुस्तक वाचायची गरज नाही, तू हे पुस्तक छापायचं बंद कर नाहीतर मी तुला घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, तुझी जीभ कापेन’, अशी भाषा संजय गायकवाड यांनी वापरली होती.
संजय गायकवाड यांची आजपर्यंतची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी यापूर्वी आमदार निवासातील कँटिनमधील कर्मचाऱ्याला चांगले जेवण न मिळाल्यामुळे मारहाण केली होती. तर कोरोनाच्या काळात फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचा विषाणू कोंबण्याची भाषाही संजय गायकवाड यांनी केली होती. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर अद्वातद्वा बोलणाऱ्या संजय गायकवाड यांनी निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर नजर टाकल्यास त्यांचे शिक्षण नववी पास इतके आहे. ते पेशाने शेतकरी आहेत. विशेष म्हणजे संजय गायकवाड यांनी बुलढाण्यातली ज्या शाळेत नववीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्या शाळेचे नाव श्री शिवाजी स्कूल असे एकेरी उल्लेखाचे आहे.
संजय गायकवाड यांनी या पुस्तकावर टीका करताना म्हटले की, 21 तारखेला एका कार्यक्रमात हे पुस्तक माझ्या पत्नीला देण्यात आले. तिने हे पुस्तक घरी आणल्यावर मी ते वाचले. त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाशी छेडछाड करण्यात आल्याचे दिसले. पुस्तकाच्या प्रत्येक पानावर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. तसेच शिवाजी महाराज क्षत्रिय होते की नाही, ते 96 कुळी होते की नाही, असे बेछूट प्रश्न विचारण्यात आल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले होते.
Shivaji Kon hota book: प्रकाशक प्रशांत आंबी पोलिसांत तक्रार करणार
आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केलेले प्रकाशक प्रशांत आंबी हे पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधातील तक्रारीचा ड्राफ्ट निश्चित करण्यासाठी वकील असीम सरोदे यांच्याकडे पाठवला आहे. तो निश्चित झाल्यानंतर कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार असल्याची माहिती प्रकाशक प्रशांत आंबी यांनी दिली आहे.
संजय गायकवाड कोण? (Sanjay Gaikwad Controversial Statements)
फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचा विषाणू कोंबणार – 19 एप्रिल 2021
कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना संजय गायकवाडांनी त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजकारण करत असल्याची टीका केली होती. त्यावरून त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यही केलं होतं. ते म्हणाले होते की, “सध्या राज्यासह देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. पण विरोधी पक्ष मदत करायचे सोडून राजकारण करत आहेत. मला जर कोरोनाचा विषाणू मिळाला तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन.”
शिवजयंती मिरवणुकीतील मारहाण – मार्च 2024
गेल्या वर्षी शिवजयंतीच्या मिरवणुकीत संजय गायकवाड यांनी एका तरुणाला काठीने मारहाण केली होती. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी 11 लाख रुपये बक्षीस – सप्टेंबर 2024
राहुल गांधी यांच्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले होते की, राहुल गांधींची जो जिभ कापेल त्याला 11 लाख रुपये बक्षीस देणार. गायकवाडांनी लोकसभा विरोधी पक्षनेत्याच्याविरुद्ध हे वक्तव्य केलं आणि पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
महाराष्ट्र पोलिस जगातील सर्वात अकार्यक्षम – एप्रिल 2025
महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सुतासारखं सरळ होईल.
मतदारांना फक्त दारू अन् मटण पाहिजे – जानेवारी 2025
विधानसभेच्या निवडणुकीत कमी मते पडल्यानंतर एका जाहीर सभेत संजय गायकवाडांनी मतदारांना शिव्या दिल्या. मतदारांना फक्त दारू आणि मटण पाहिजे. हे दोन हजारात विकले जातात. यांच्यापेक्षा वेश्या बऱ्या असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य – 7 जुलै 2025
भाषेच्या मुद्द्यावर बोलताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते काही मुर्ख होते का असं वाचाळवीरपणा गायकवाडांनी केला. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामातांबद्दलही अपशब्द वापरले.
वाघाच्या शिकारीचा दावा – फेब्रुवारी 2024
सन 1987 साली आपण वाघ मारला होता आणि त्याचा दात गळ्यात घालून फिरतोय असा दावा संजय गायकवाड यांनी केला होता.
शेती बळकावल्याचा आरोप आणि अॅट्रॉसिटी प्रकरण (जुलै 2021 आणि फेब्रुवारी 2024)
2021 मध्ये गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप झाला. त्यांनी एका गावात कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे वक्तव्य केले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. दोन्ही प्रकरणांमध्ये गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. शेती बळकावण्याच्या प्रकरणात न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले.
शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ
संजय गायकवाड यांनी एका शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ केली होती. तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
आणखी वाचा
Comments are closed.