IPL 2026 – चेन्नईचा नवा डाव! आयुष म्हात्रेच्या जागी वेगवान गोलंदाजाची वर्णी
चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतीमुळे आयपीएलच्या चालू हंगामातून बाहेर पडला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना म्हात्रेच्या ‘हॅमस्ट्रिंग’ला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला संपूर्ण स्पर्धेला मुकावे लागणार असून, गायकवाडसोबत सलामीला कोण येणार, असा मोठा प्रश्न आता चेन्नईसमोर उभा ठाकला आहे. आधीच वेगवान गोलंदाज नॅथन एलिस आणि खलील अहमद दुखापतीमुळे बाहेर असताना म्हात्रेच्या जाण्याने चेन्नईची डोकेदुखी वाढली आहे.
या संकटकाळात चेन्नई सुपर किंग्सने अनुभवी वेगवान गोलंदाज आकाश मधवाल याला संघात सामील करून घेतले आहे. 32 वर्षीय मधवालला म्हात्रेचा रिप्लेसमेंट म्हणून 30 लाख रुपयांच्या करारावर संघात स्थान मिळाले आहे. मधवालने यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी 2023 च्या हंगामात 8 सामन्यांत 14 बळी घेत आपली छाप पाडली होती. 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला 1.20 कोटी रुपयांना खरेदी केले होते, मात्र तिथे त्याला विशेष कामगिरी करता आली नव्हती. आता चेन्नईच्या ताफ्यात सामील होऊन तो आपली जुनी लय परत मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.
मधवालच्या आगमनामुळे चेन्नईच्या गोलंदाजीला बळकटी मिळणार असली तरी, प्लेइंग इलेवनचे संतुलन मात्र पूर्णपणे बदलणार आहे. म्हात्रे एक सलामीवीर फलंदाज होता, तर मधवाल एक गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत कर्णधार ऋतुराज गायकवाडसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी चेन्नईला आता डेव्हन कॉन्वे किंवा अन्य पर्यायाचा विचार करावा लागेल. गोलंदाजांच्या दुखापतींनी त्रस्त असलेल्या चेन्नईसाठी मधवालचा अनुभव उपयुक्त ठरेल, मात्र फलंदाजीतील पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान संघ व्यवस्थापनासमोर असेल.
Comments are closed.