उद्धवजी, विधान परिषदेवर तुम्हीच जा! राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आग्रह
उद्धवजी, तुम्हीच विधान परिषदेवर जा, असा आग्रह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत. त्यांनी विधान परिषदेवर जावे, अशी भूमिका कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मांडली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीदेखील ‘एक्स’ पोस्ट करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक येत्या 12 मे रोजी होत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महायुतीच्या आठ तर महाविकास आघाडीची एक जागा निवडून येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत उपस्थित होते.
या भेटीनंतर सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच्या भेटीमध्ये सद्य राजकीय परिस्थिती आणि भविष्यातील आव्हानांबाबत साधकबाधक चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये योग्य संवाद रहावा यासाठी ही भेट होती, असे ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही एक्स पोस्ट करत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विधान परिषदेवर यावं अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे म्हटले आहे.
विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांनीच जावे, अशी राष्ट्रवादीची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विधान परिषद निवडणुकीसंदर्भात या भेटीत चर्चा झाली नाही. पण उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद लढवावी अशी भूमिका काँग्रेस पक्षाने यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यासंदर्भात आघाडीतील तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असे सपकाळ म्हणाले.
Comments are closed.