149 दिवसांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले
मुख्यमंत्र्यांनंतर शंकराचार्यांनी घेतले दर्शन
वृत्तसंस्था/चमोली
चारधाम यात्रेच्या पाचव्या दिवशी उत्तराखंडमधील चमोली येथील बद्रीनाथ धामचे दरवाजे गुरुवारी औपचारिकपणे उघडण्यात आले. सकाळी 6:15 वाजता मंदिराचे दरवाजे उघडताच मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सर्वप्रथम दर्शन घेतले. त्यानंतर शंकराचार्य स्वामी अविमुक्तश्वरानंद यांनी दर्शन घेतले. त्यापाठोपाठ तब्बल 149 दिवसांनंतर भगवान बद्रीविशाल यांनी भक्तांना दर्शन दिले. चारधाम यात्रा अक्षय्या तृतीयेपासून सुरू झाली असून केदारनाथनंतर आता चमोली येथील बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या उपस्थितीत भगवान बद्रीनाथ मंदिराचे भव्य दरवाजे उघडण्यात आले. सकाळी 6:15 वाजता हजारो भक्तांसाठी संपूर्ण विधींसह मंदिराचे दरवाजे उघडताच संपूर्ण आकाश भगवान बद्री विशाल यांच्या जयघोषाने दुमदुमून गेले.
भगवान बद्रीनाथांच्या दिव्य दर्शनासाठी मंदिर 25 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. भगवान बद्री विशाल यांच्या मंदिरात पहिल्यांदाच फुलांनी ‘ॐ लक्ष्मीपतये नम:’ लिहिण्यात आले आहे. तसेच ‘जय बद्री विशाल’ आणि ‘ॐ वैकुंठाय नम:’ अशा अक्षरांनीही पुष्प सजावट करण्यात आली होती. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्याने उत्तराखंडमधील चारधाम यात्रा 2026 पूर्णपणे सुरू झाली आहे. सर्वप्रथम 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरांचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर, 22 एप्रिल रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजेही उघडण्यात आले. यासह, श्रद्धा, भक्ती आणि आदराशी निगडित असलेली चारधाम यात्रा सुरू झाली आहे.
दरवाजे बंद का असतात?
चारही धाम उंच हिमालयीन प्रदेशात वसल्यामुळे हिवाळ्यात या भागांमध्ये मुसळधार हिमवृष्टी आणि तीव्र थंडीचा धोका असतो. म्हणूनच दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चार धामांचे दरवाजे भक्तांसाठी बंद केले जातात. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात चारधामांचे दरवाजे पुन्हा उघडले जातात. चारधाम यात्रा अंदाजे सहा महिने चालते. उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या या धामांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येथे येत असतात.
Comments are closed.