अतिताणाच्या वेळापत्रकामुळे खेळाडूंना संपवलं जातंय, ललित मोदींचा बीसीसीआयवर हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘अतिताणाच्या वेळापत्रकामुळे खेळाडूंना संपवलं जातंय,’ असा थेट आरोप करत त्यांनी बीसीसीआयच्या धोरणांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

आयपीएल 2026 संपताच लगेच अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना ठेवण्याच्या निर्णयावरून वाद पेटला आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिलदेखील या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचा संताप उफाळून आला.

सोशल मीडियावर त्यांनी स्पष्ट शब्दांत फटकारलं की, ‘खेळाडूंना मशीन समजणं थांबवा. त्यांनाही कुटुंबासोबत वेळ आणि विश्रांती हवी. पैशांसाठी त्यांना पिळू नका.’ त्यांनी आठवण करून दिली की, ‘आयपीएलसाठी त्यांनी तयार केलेली वार्षिक स्थिर उत्पन्नाची व्यवस्था इतकी भक्कम आहे की, बीसीसीआयला आर्थिक चिंता करण्याची गरजच नाही.’

मोदी इथेच थांबले नाहीत. बीसीसीआयमध्ये खेळाडूंचा सहभाग वाढवा, व्यावसायिक मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करा आणि मानवी संसाधनाला पेंद्रस्थानी ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला. स्टेडियम आणि चाहत्यांचा अनुभव जागतिक दर्जाचा करण्यावर लक्ष द्या, असा सडेतोड सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग नसल्याने काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत नव्या चेहऱयांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र मोदींच्या या टीकेमुळे बीसीसीआयच्या धोरणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून खेळाडूंचे आरोग्य की पैशांचा खेळ? हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments are closed.