सॅम सनसनाटी ! मुंबईच्या वानखेडेवर चेन्नईने जिंकला अस्तित्व लढा
चार पराभवांनी आयपीएलच्या गुणतालिकेत रसातळाला पोहोचलेल्या पंचट्रॉफी विजेत्या संघांचा वानखेडेवरचा अस्तित्व लढा संजू सॅमसनच्या सनसनाटी अन् तुफानी शतकामुळे चेन्नईने जिंकला आणि गुणतालिकेत थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली.
चेन्नईची फलंदाजी पुन्हा ढेपाळली, पण संजूने पूर्ण 20 षटके किल्ला लढवत संघाला 207 धावांपर्यंत पोहोचवण्याचा पराक्रम गाजवला. हाच पराक्रम चेन्नईच्या विजयाचा पाया ठरला. संजूने आयपीएलमधील आपले दुसरे शतक साजरे करताना 54 चेंडूंत 6 षटकार आणि 10 चौकारांची फटकेबाजी केली. त्याला अन्य कुणाचीही फारशी साथ लाभली नाही तरीही त्याने एकहाती 200 चा टप्पा गाठला, पण 208 धावांचा पाठलाग करताना मुंबईसाठी कुणीही सनसनाटी फलंदाजी करू शकला नाही.
होसेनने मुंबईला हरवले
अखिल होसेनने आपल्या चार चेंडूंत मुंबईच्या दानिश मालेवार आणि नमन धीर या दोघांची विकेट काढत मुंबईची वाट बिकट केली. त्याच्या या विकेटमुळे मुंबई विजयाच्या ट्रकवरून घसरली. क्विंटन डिकापॅ (7) मुकुल चौधरीचा बळी ठरला आणि मुंबईची 3 बाद 11 अशी केविलवाणी अवस्था झाली. येथेच मुंबईचे अस्तित्व संपले आणि त्यानंतर मुंबईच्या रथीमहारथींनी केवळ 20 षटके फलंदाजी करण्याचे ध्येय डोळय़ासमोर ठेवले, पण तेसुद्धा साध्य करता आले नाही.
मुंबईची दोनदा घसरगुंडी
पहिल्या तीन षटकांत घसरगुंडी उडाल्यानंतर सूर्यकुमार यादव (35) आणि तिलक वर्मा (37) यांना चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागी रचली, पण ती धावांचा पाठलाग करणारी भागी नव्हती. ही जोडीही होसेनने बाद करत 17 धावांत 4 विकेट टिपले. 3 बाद 11 वरून मुंबईचा स्कोअर 3 बाद 84 वर पोहोंचला, पण तेव्हा मुंबईची डावात दुसऱयांदा घसरगुंडी उडाली आणि 9 चेंडूंत 3 धावांवर 4 फलंदाज बाद झाले. मुंबईची 7 बाद 87 अशी दुर्दशा करून चेन्नईने आपल्या तिसऱया विजयाची नोंद केली. त्यानंतर मुंबईने 19 व्या षटकांतपर्यंत फलंदाजी ताणली, पण धावांचा आकडा 104 पर्यंत पोहोचला आणि चेन्नईने 103 धावांनी शतकी विजयानंद साजरा केला.
रोहितही नाही अन् धोनीही नाही
आज मुंबईकरांना रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीच्या खेळण्याची अपेक्षा होती. दोघांच्याही खेळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आजही हे दिग्गज अनफिटच ठरले आणि दोघांनीही डगआऊटमध्येच बसणे पसंत केले.
शमशोन हा तारणारा आहे
चेन्नईच्या डावाला खिंडार पाडता आले नाही. पण संजूने सर्व आघाडीच्या फलंदाजांसह छोटय़ा छोटय़ा भागी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. चेन्नईचा एकही धावांची पंचविशी गाठू शकला नाही. तरीही सॅमसनने 30-40 धावांच्या भागीदाऱया रचत चेन्नईला अनपेक्षितपणे 200 चा टप्पा ओलांडून दिला. दिल्लीविरुद्ध 115 धावांची नाबाद खेळी करताना संजूने 20 षटके अभेद्य फलंदाजी केली होती आणि आजही त्याने त्याच खेळीची पुनरावृत्ती केली. अवघ्या दोन आठवडय़ांत त्याने दुसरे शतक साजरे केले. हे यंदाच्या आयपीएलमधील 33 सामन्यांमध्ये ठोकले गेलेले पाचवे शतक ठरले आहे. संजूसह अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि क्विंटन डिकॉक यांनी शतके साजरी केली आहेत.
Comments are closed.