मुंबईत श्रीमंतांनाही घरे परवडेनाशी, कोट्यवधी रुपये असूनही मनासारखे घर मिळेना
मुंबईत घरं इतकी महाग झाली आहेत की आता श्रीमंतानांही घरं मिळत नाहीयेत. अगदी कोट्यवधी रुपयांचे बजेट असूनही अनेकांचे हे हाल आहेत. मुंबईत घरांच्या किमती झपाट्याने वाढत असल्याने, सुमारे 1 मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 9.4 कोटी रुपये बजेटमध्ये आता पाच वर्षांपूर्वीपेक्षा कमी जागा मिळत असल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
आंतरराष्ट्रीय प्रॉपर्टी सल्लागार Knight Frank यांच्या Wealth Report 2026 नुसार, 2020 मध्ये 1 मिलियन डॉलरमध्ये मुंबईत सुमारे 106 चौरस मीटर (1140 चौ. फूट) घर मिळत होते. मात्र 2025 मध्ये हीच जागा घटून फक्त 96 चौरस मीटर (1033 चौ. फूट) इतकी झाली आहे.
यामागे मुंबईत उपलब्ध जमीन कमी असणे, किनारपट्टीमुळे बांधकामावर मर्यादा आणि जागतिक गुंतवणूकदारांची मोठी मागणी ही कारणे असल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये परिस्थिती थोडी वेगळी आहे. या शहरांमध्ये त्याच बजेटमध्ये मिळणारी जागा किंचित वाढली आहे.
दिल्लीत 2020 मध्ये 202 चौरस मीटर मिळत होते, ते 2025 मध्ये 205 चौरस मीटर झाले.
बंगळुरूमध्ये 351 वरून 357 चौरस मीटरपर्यंत वाढ झाली.
मुंबई अजूनही देशातील सर्वात श्रीमंतांचे प्रमुख केंद्र आहे. देशातील सुमारे 35% अतिश्रीमंत लोक मुंबईत राहतात. गेल्या पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत 38% वाढ झाल्याने संपत्तीही वेगाने वाढली आहे. 2025 मध्येच मुंबईत पाच मिलियन डॉरल पेक्षा जास्त किंमतीच्या 56 घरांची खरेदी-विक्री झाली.
जागतिक स्तरावर पाहिले तर, मुंबईत खरेदीक्षमता सुमारे 9% घटली आहे. मात्र दुबई (66%), टोकियो (41%) आणि मियामी (40%) या शहरांमध्ये याहून जास्त घसरण झाली आहे. तर लंडनमध्ये 7% वाढ झाली असून मेलबर्नमध्ये 4% वाढ आणि हाँगकाँगमध्ये स्थिती स्थिर आहे.
दरम्यान, $30 दशलक्षपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची (अतिश्रीमंत) संख्या हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2020 ते 2025 दरम्यान ही संख्या 12 हजारांवरून जवळपास 20 हजारांपर्यंत (63% वाढ) पोहोचली आहे. पुढील काही वर्षांत ही संख्या आणखी वाढून 2031 पर्यंत 25 हजारांहून अधिक होण्याचा अंदाज आहे.
तज्ज्ञांच्या मते, आता श्रीमंत लोक फक्त गुंतवणूक म्हणून नव्हे तर चांगल्या जीवनशैलीसाठी मोठी आणि आलिशान घरे खरेदी करत आहेत. त्यामुळे मुंबईत मोठी घरे, ब्रँडेड प्रोजेक्ट्स आणि जास्त सुविधा असलेल्या घरांची मागणी वाढत आहे.
Comments are closed.