स्टेशनमधील माहिती पत्रकारांपर्यंत कशी पोहोचली? अधिकाऱ्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

नागपूर बातम्या : नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये (Nagpur Cyber Police Station) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस स्टेशनमधील माहिती बाहेर कशी गेली, यावरून एका पोलीस कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलातच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित पोलीस कर्मचारी गेल्या 24 तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. प्रफुल्ल ठाकरे असं या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे.

Nagpur Police Assault Allegation : माहिती लीक प्रकरणावरून वाद

पोलीस स्टेशनमधील कारवाईची माहिती पत्रकारांपर्यंत कशी पोहोचली, यावरून अधिकाऱ्याने पोलीस कर्मचारी प्रफुल्ल ठाकरे यांची विचारणा केली. याच कारणावरून त्यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली आणि मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Nagpur Missing Constable : तक्रारीनंतरच बेपत्ता

मारहाण आणि अपमान झाल्याची तक्रार घेऊन प्रफुल्ल ठाकरे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले होते. मात्र त्यांना न्याय न मिळाल्याने ते कालपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळालं आहे.

Missing Constable Family Allegation : कुटुंबीयांचा गंभीर आरोप

प्रफुल्ल ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी सायबर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. काही अधिकारी स्वतःच्या चुका झाकण्यासाठी प्रफुल्ल यांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमच्या मुलाचा शोध घ्या, काहीही अनुचित घडलं तर जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Nagpur Police Response : अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

या प्रकरणी आरोप झालेले पोलीस अधिकारी विजय राणे यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. त्यांनी प्रफुल्ल ठाकरे यांना पोलीस स्टेशनमधील माहिती पत्रकारांपर्यंत कशी काय गेली याची विचारणा केल्याची कबुली दिली. मात्र या प्रकरणी कोणतीही मारहाण झाली असल्याचा आरोप पोलीस अधिकारी विजय राणे यांनी फेटाळला आहे.

Nagpur Public Concern : पोलीस ठाण्यातच सुरक्षा प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर पोलीसच पोलीस ठाण्यात सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रफुल्ल ठाकरे यांच्या आई-वडिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्या मुलाचा शोध घ्यावा, अशी विनंती केली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.