केएल राहुलच्या शतकावर श्रेयस अय्यरचे अर्धशतक भारी; पंजाब किंग्सचा ऐतिहासिक विजय!
आयपीएल २०२६ च्या ३५ व्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा ६ गड्यांनी पराभव केला. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर २६५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना पंजाबच्या संघाने १८.५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात २६५ धावा करून सामना जिंकला. पंजाबच्या या विजयाचा नायक ठरला तो म्हणजे कर्णधार श्रेयस अय्यर; त्याने अवघ्या ३६ चेंडूत नाबाद ७१ धावांची वादळी खेळी करून संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आयपीएलच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी ‘रन चेस’ (धावांचा पाठलाग) आहे.
२६५ धावांच्या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्सला सलामीवीर प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग यांनी दमदार सुरुवात करून दिली. प्रियांश आणि प्रभसिमरन यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. प्रियांश १७ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला. त्यानंतर प्रभसिमरन देखील २६ चेंडूत ७६ धावांची खेळी करून तंबूत परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कूपर कोनोली फक्त १७ धावा काढून बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने नेहल वढेरासह डाव सावरला आणि चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली.
वढेरा १५ चेंडूत २५ धावा करून बाद झाला, तर श्रेयसने खिंड लढवत शानदार अर्धशतकी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. श्रेयसने ३६ चेंडूत नाबाद ७१ धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यामध्ये ३ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याला शशांक सिंगने १० चेंडूत १९ धावांची नाबाद साथ दिली. श्रेयसच्या या फटकेबाजीमुळे पंजाबने १८.५ षटकांतच ४ गड्यांच्या मोबदल्यात २६५ धावांचे लक्ष्य गाठले. २६४ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून पंजाबने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला, जो त्यांनी २०२४ मध्ये केकेआर (KKR) विरुद्ध २६१ धावांचा पाठलाग करताना बनवला होता. पंजाबचा ७ सामन्यांतील हा सहावा विजय असून या हंगामात संघ अजूनही अजिंक्य आहे.
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो फलंदाजांनी पूर्णपणे सार्थ ठरवला. दिल्लीची सुरुवात तशी चांगली झाली नाही आणि सलामीवीर पथुम निसांका फक्त ११ धावा करून बाद झाला. त्याला तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने बाद केले. मात्र, त्यानंतर दिल्लीचे फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांवर पूर्णपणे हावी झाले. केएल राहुलने तुफानी फलंदाजी करत अवघ्या ४७ चेंडूत शतक ठोकले.
राहुलने पंजाबच्या गोलंदाजीचे वाभाडे काढत ६७ चेंडूत १५२ धावांची ऐतिहासिक खेळी केली, ज्यामध्ये ९ षटकार आणि १६ चौकारांचा समावेश होता. आयपीएलमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. राहुल व्यतिरिक्त नितीश राणाने देखील ४४ चेंडूत ९१ धावांची शानदार खेळी केली, मात्र त्याचे शतक थोडक्यात हुकले. राहुलच्या या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर दिल्लीने २० षटकांत २ बाद २६४ धावांचा डोंगर उभा केला होता. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि झेवियर बार्टलेट यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
Comments are closed.