पंजाबचा दिल्लीवर ऐतिहासिक विजय; प्रभसिमरन, श्रेयसची अर्धशतके राहुलच्या दीड शतकापेक्षा भारी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तब्बल 529 धावांची लयलूट झालेल्या हायलाईट्ससारख्या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करीत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळविला. याआधीचा सर्वाधिक 262 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रमही पंजाबच्याच नावावर होता. दिल्लीच्या के. एल. राहुलने नाबाद 152 धावांची खेळी करीत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. मात्र प्रभसिमरन सिंग (76) व कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद 71) यांची तुफानी अर्धशतके राहुलच्या दीडशतकावर भारी ठरली, हे विशेष. मात्र ‘सामनावीर’ची माळ पराभूत दिल्ली कॅपिटल्सच्या राहुलच्या गळ्यात पडली.

प्रियांशप्रभसिमरनची पॉवरफुल फलंदाजी

दिल्लीकडून मिळालेले 265 धावांचे लक्ष्य पंजाबने 18.5 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पूर्ण करीत उपस्थित क्रिकेटप्रेमींचे पैसावसूल मनोरंजन केले. प्रियांश आर्य (43) व प्रभसिमरन सिंग (76) यांनी पॉवर प्लेच्या सहा षटकांत पॉवरफुल फलंदाजी करताना धावफलकावर शतक झळकाविले. या दोघांनी पंजाबला 6.5 षटकांत 126 धावांची खणखणीत सलामी देताना दिल्लीच्या गोलंदाजीची पिसे काढली. प्रियांशने 17 चेंडूंत 43 धावा फटकाविताना 2 चौकारांसह 5 षटकारांचा घणाघात केला, तर प्रभसिमरनने 26 चेंडूंत 76 धावा फटकाविताना 9 सणसणीत चौकारांसह 5 टोलेजंग षटकार ठोकले. कर्णधार अक्षर पटेलने प्रियांशला रिझवीकरवी झेलबाद करीत ही जोडी फोडली. त्यानंतर कुलदीप यादवने प्रभसिमरनला पायचित पकडून दिल्लीला मोठे यश मिळवून दिले. मग कुलदीपनेच कूपर कोनोलीचा (17) त्रिफळा उडवून पंजाबला तिसरा धक्का दिला.

श्रेयसची मॅचविनिंग खेळी

सलामीच्या जोडीने आपली जबाबदारी चोखपणे बजावल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने मधल्या फळीतील फलंदाजांना हाताशी धरून मॅचविनिंग खेळी केली. त्याने आधी नेहाल वढेराच्या (25) साथीत 31 चेंडूंत 56 धावांची भागीदारी केली. विपराज निगमने वढेराला बदली खेळाडू करुण नायरकरवी झेलबाद करून दिल्लीला चौथे यश मिळवून दिले, मात्र तोपर्यंत पंजाबने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला होता. मग श्रेयसने आलेल्या शशांक सिंगच्या (नाबाद 16) साथीत 26 चेंडूंत 64 धावांची अभेद्य भागीदारी करीत पंजाबच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रेयसने 36 चेंडूंत 7 षटकार व 3 चौकारांसह आपली नाबाद 71 धावांची खेळी सजविली. दिल्लीकडून कुलदीप यादवने 2, तर अक्षर पटेल व विपराज निगम यांनी 1-1 फलंदाज बाद केले.

राहुलचे शतक; नितीशला हुलकावणी

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने तुफानी फलंदाजी करत केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 264 धावांचा डोंगर उभारला. के. एल. राहुलच्या वादळी दीड शतकी खेळाच्या जोरावर दिल्लीने पंजाबच्या गोलंदाजांचा अक्षरशः पालापाचोळा केला. अवघ्या 54 चेंडूंत 126 धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याच्या या नाबाद खेळीला 13 चौकार आणि 8 षटकारांचा साज होता. सलामीवीर पथूम निस्संका 11 धावांवर बाद झाल्यानंतरही लोकेश राहुलवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याला दुसऱ्या बाजूने नितीश राणाची दमदार साथ लाभली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 96 चेंडूंत 220 धावांची वादळी भागीदारी केली. नितीशनेही 44 चेंडूंत 11 चौकार व 4 षटकारांसह 91 धावांची स्फोटक खेळी करीत राहुलला तोलामोलाची साथ दिली. त्याचे शतक अवघ्या 9 धावांनी हुकले.

अखेरच्याषटकांत ९९ धावा

दिल्लीने अखेरच्या 5 षटकांत अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. त्या 5 षटकांत तब्बल 99 धावा चोपल्या. विशेषतः विजयकुमार वैशाखच्या एका षटकात राहुलने चौफेर फटकेबाजी करत 24 धावा वसूल केल्या आणि संघाला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

Comments are closed.