वाढीव किमतीचा फटका… म्हाडाच्या मुंबईतील घरांकडे सर्वसामान्यांनी पाठ फिरवली, 2640 घरांसाठी जेमतेम 25 हजार अर्ज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कमी किमतीत मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहतात. म्हाडाच्या मुंबईमधील 2640 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत संपायला जेमतेम चार दिवस शिल्लक असून आतापर्यंत अनामत रकमेसह केवळ 25 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. आधीच अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी यंदाच्या लॉटरीत कमी घरे आहेत, त्यातच या घराच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे सर्वसामान्यांनी म्हाडाच्या घरांकडे सपशेल पाठ फिरवली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने दादर, वांद्रे, गिरगाव, गोरेगाव, विक्रोळी येथील 2640 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे.  या लॉटरीतील सर्वात कमी किमतीचे घर पीएमजीपी मानखुर्द येथे असून त्याची किंमत 29 लाख 37 हजार रुपये आहे, तर सर्वात महागडे घर ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये असून त्याची किंमत 6 कोटी 82 लाख रुपये आहे. लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी केवळ 145 घरे उपलब्ध आहे. अल्प उत्पन्न गटासाठी 858 घरे असली तरी त्याच्या किमती कोटय़वधींच्या घरात आहेत. वरळीत अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या फ्लॅटची किमत चक्क 2 कोटी 9 लाख रुपये आहे. घरांच्या किमती पाहून सर्वसामान्यांना घाम फुटला असून कोणत्या योजनेत अर्ज भरायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे म्हाडाची घरे खरंच परवडणारी आहेत का, असे म्हणायची सर्वसामान्यांवर वेळ आली आहे.

किमती कमी होऊन मुदतवाढ मिळणार?

म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी अर्जदारांचे लाखोंच्या संख्येने अर्ज येतात. मुंबई मंडळातर्फे मे 2023 मध्ये 4083 घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठी 1 लाख 19 हजार 278 अर्जदारांनी, तर सप्टेंबर 2024 मध्ये काढलेल्या 2030 घरांच्या सोडतीसाठी 1 लाख 13 हजार 811 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज केले होते.

2640 घरांसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत 39,986 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ 24,821 जणांनी अनामत रक्कम भरली आहे. इतकी कमी अर्ज संख्या पाहता अर्ज करण्यासाठी म्हाडाकडून मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र म्हाडा घरांच्या किमती कमी करणार का, याकडे  अर्जदारांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.