चंद्रपूरच्या मूलमध्ये प्रस्तावित मालधक्क्याला विरोध; मुख्यमंत्र्यांच्या काकू आणि ग्रामस्थांमधील संघर्षाची चर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथे प्रस्तावित मालधक्क्यावरून मुख्यमंत्र्यांच्या काकू आणि गावकरी असा संघर्ष रंगला आहे. लोह दगडांची वाहतूक रेल्वेने व्हावी, यासाठी मूल रेल्वेस्थानकावर मालधक्का व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांची आहे. तर या मालधक्क्यामुळे मूल शहर आणि आजुबाजूची गावे प्रदूषणाच्या विळख्यात गुदमरून जातील, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

काही मूठभर कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी लाखो लोकांना वेठीस धरू नका, अशी मागणी मूलवासियांनी केली आहे. नगरपालिकेने हा मालधक्का इथे होऊ नये, असा एकमताने ठराव पारित केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड इथून हे लोहखनिज आणले जाणार आहे. या लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे आणि उठणाऱ्या धुळीने गडचिरोलीचे जंगल आणि शेकडो गावे लाल रंगाने माखली आहेत. आता तेच खनिज गावातील रेल्वेस्थानकावर आणल्यास गावाची काय अवस्था होईल, याचा विचारच करवत नाही, असा युक्तिवाद गावकऱ्यांचा आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील लोकांनी एकत्र येत माध्यमांपुढे आपली भूमिका मांडली. शोभाताईंनी या मालधक्क्यासाठी आग्रह सोडावा आणि इतर दुसरे शेतीपूरक उद्योग आणावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

मालधक्का इथे आल्यास रोजगार निर्मिती होईल, हा दावाही गावकऱ्यांनी खोडून काढला आहे. तर दुसरीकडे शोभाताईंनी, हा मालधक्का कसा आवश्यक आहे, हे सांगणे सुरू केले. या खनिजाची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र मार्ग असणार आहेत. यामुळे रोजगारनिर्मिती होणार, असे फायदे त्यांनी सांगितले. विरोध करणारे स्वतःची शेती वाचवण्यासाठी हा विरोध करीत असून त्यांनी नीट अभ्यास करावा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला. त्यामुळे मालधक्क्याचा विषय आता जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला असून आजवर चर्चेत नसलेल्या शोभाताई अचानक या मुद्द्याने केंद्रस्थानी आल्या. या संघर्षात विजय नेमका कुणाचा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या क्षेत्राचे आमदार आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मालधक्क्याला विरोध केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी हा मालधक्का रद्द करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांमध्येही या मुद्द्यावरून फूट पडल्याचे दिसत आहे.

Comments are closed.