यवतमाळ आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार; १८ जणांवर कारवाईचा प्रस्ताव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यवतमाळ येथील डायाभाई मावजी मजीठिया आयुर्वेदिक महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा छळ (रॅगिंग) झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूजीसीच्या अँटी रॅगिंग हेल्पलाइनवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीदरम्यान प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून मानसिक तसेच शारीरिक त्रास दिल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने कठोर भूमिका घेत एका विद्यार्थ्याला एक वर्षासाठी निष्कासित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली असून, उर्वरित विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे. एकूण १८ जणांवर कारवाईची तलवार लटकली आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत यवतमाळचे तहसीलदार योगेश देशमुख, अवधुतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव मुंदाणे यांच्यासह पत्रकार गावंडे आणि विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश होता.

“रॅगिंग हा अत्यंत गंभीर व कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक आणि उदाहरण ठरेल अशी कारवाई करण्यात येईल,” असे तहसीलदार योगेश देशमुख यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.