Pune News – जेजुरीजवळील बेलसर येथे मशरूम कंपनीत मोठी दुर्घटना; विषारी वायूमुळे गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जेजुरीजवळील बेलसर येथील एका मशरूम निर्मिती कंपनीत सांडपाण्याची टाकी स्वच्छ करताना विषारी वायूमुळे गुदमरून तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज (26 एप्रिल 2026) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. पिंटू राजेश प्रसाद (वय 23), व्यास सोहम कुमार (वय 22) आणि गौतम रामसुरण कुशवाहा (वय 36) अशी मृतांची नावे असून, हे तिघेही मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलसर येथील ‘वाडा ऍग्रो मशरूम’ या कंपनीत मशरूम उत्पादनाचे काम चालते. या ठिकाणी मशरूम प्रक्रियेतील खराब पाणी साठवण्यासाठी 5 बाय 5 फूट आकाराची सिमेंटची भूमिगत टाकी आहे. ही टाकी बऱ्याच दिवसांपासून बंद होती आणि त्यात सुमारे दोन फुटांपर्यंत पाणी साठलेले होते. आज दुपारी ही टाकी स्वच्छ करण्यासाठी एक कामगार आत उतरला असता, तिथे साठलेल्या विषारी वायूमुळे आणि उष्णतेमुळे त्याचा श्वास गुदमरला. त्याला वाचवण्यासाठी वर उभा असलेला दुसरा कामगार तातडीने खाली उतरला, मात्र त्यालाही विषारी वायूची बाधा झाली.

हे भीषण दृश्य पाहून कंपनीचा ठेकेदार दोघांना वाचवण्यासाठी टाकीत उतरला, परंतु तोही शुद्ध हरपून तिथेच कोसळला. तिघेही बाहेर येत नसल्याचे पाहून इतर कामगारांनी मोठा आरडाओरडा केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने जेसीबी मशीन पाचारण करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने टाकीचा स्लॅब तोडून तिघांना बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही टाकी बराच काळ बंद असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात विषारी वायू तयार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कंपनीत काम करणारे बहुतांश कामगार हे परप्रांतीय असून, या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जेजुरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments are closed.