बार्शी रोडवर रुग्णवाहिकेचा पार्ट रस्त्यात निखळला, मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णासाठी देवदूत ठरले युवक
मुरूड ग्रामीण रुग्णालयातील एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे, ज्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. करंट लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णाला तातडीने पुढील उपचारासाठी मुरूड येथून लातूरकडे १०८ रुग्णवाहिकेतून हलवण्यात येत होते. मात्र, प्रवासादरम्यान काही अंतर पार करताच रुग्णवाहिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग अचानक रस्त्यात गळून पडला. क्षणभरातच परिस्थिती अत्यंत भयावह झाली.रुग्णाचा जीव धोक्यात आला आणि मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली.
अशा जीवघेण्या क्षणी, सुदैवाने त्या ठिकाणी उपस्थित असलेले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुकेश सवासे, उपाध्यक्ष सुरज कांबळे आणि समाधान गायकवाड यांनी तत्परता आणि माणुसकीचे उदाहरण घालून दिले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत वेळ न दवडता तात्काळ खासगी रुग्णवाहिका बोलावली. पत्रकार मनोज जोशी यांच्या सहकार्याने त्यांनी संबंधित रुग्णाला सुरक्षितपणे लातूरकडे रवाना केले. या युवकांनी दाखवलेली संवेदनशीलता, जबाबदारी आणि धाडस हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कृतीमुळे एका रुग्णाचा जीव वाचण्यास मदत झाली आणि समाजासमोर एक आदर्श उभा राहिला.
मात्र, या घटनेने एक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण केला आहे .ग्रामीण भागातील रुग्णवाहिका सेवा इतकी निष्काळजी का आहे? रुग्णवाहिकेचा महत्त्वाचा भाग रस्त्यात गळून पडणे ही केवळ दुर्लक्षाची बाब नसून प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील मोठे अपयश आहे. जर या घटनेतून एखादा अपघात झाला असता, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? स्थानिक आमदार आणि संबंधित प्रशासन नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
या पार्श्वभूमीवर, संबंधित यंत्रणांनी तातडीने या घटनेची चौकशी करून ग्रामीण रुग्णवाहिका सेवांची सखोल तांत्रिक तपासणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments are closed.