रिषभ पंतचे कर्णधारपद जाणार! एलएसजीच्या कॅप्टनपदासाठी परदेशी खेळाडूचे नाव चर्चेत

लखनऊ सुपर जायंट्सचा संघ या हंगामात अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघ सतत सामने हरत आहे. आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांपैकी संघाने केवळ २ विजय मिळवले आहेत, तर ६ सामन्यांत त्यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात संघाला विजयाची सुवर्णसंधी होती, पण सुपर ओव्हरमध्ये फ्रँचायझीचा पराभव झाला. अशा परिस्थितीत आता ऋषभ पंतच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वसीम जाफरने पंतला कर्णधारपदावरून हटवून एका परदेशी खेळाडूकडे ही जबाबदारी सोपवण्याबाबत भाष्य केले आहे.

​वसीम जाफरने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “लखनऊ सुपर जायंट्सचा संघ या हंगामात पूर्णपणे खराब लयीत दिसत आहे. सध्या त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी हे सांगणेही कठीण आहे. जर मी डगआउटमध्ये असतो, तर पहिली गोष्ट हीच केली असती की, एडन मार्करमची कर्णधार म्हणून नियुक्ती केली असती. मी मार्करम आणि मिचेल मार्शला संघाचे सलामीवीर बनवले असते. तिसऱ्या क्रमांकावर निकोलस पूरन फलंदाजीला आला असता. त्यानंतर निकोलस पूरन आणि ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर, तर आयुष बदोनी पाचव्या क्रमांकावर खेळला असता. शेवटी अब्दुल समद आणि मुकुल चौधरी. हा माझा ‘टॉप ७’ असता आणि मी याच फलंदाजीच्या क्रमासह मैदानात उतरलो असतो.”

​ऋषभ पंत या आयपीएल हंगामात आतापर्यंत अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. त्याने संघासाठी खेळलेल्या ८ सामन्यांत १८्यांत १८९ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी केवळ २७ ची असून स्ट्राईक रेटही १२६.८४ राहिला आहे. गेल्या हंगामातही तो १४ सामन्यांत केवळ २६९ धावाच करू शकला होता, ज्यात त्याच्या एका शतकाचा समावेश होता. कर्णधारपदासोबतच त्याच्या फलंदाजीवरही सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कर्णधार आणि फलंदाज म्हणून लखनऊच्या संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत, अन्यथा व्यवस्थापन काही मोठे पाऊल उचलू शकते.

Comments are closed.