ट्रॉफी नाही तर काय झालं! केएल राहुलचा आयपीएल मिशन क्लियर, आता धोनीसारखा बनण्याचा…
भारतीय संघाचा विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल सध्या चर्चेत आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून सलामीला खेळणाऱ्या राहुलने स्पष्टपणे सांगितले की, त्याला महेंद्र सिंह धोनीप्रमाणे पाच आयपीएल किताब जिंकायचे आहेत. वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाच्या यशालाच तो अधिक महत्त्व देतो.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नुकताच धोनीला मागे टाकलेल्या राहुलने या कामगिरीकडे फारसे महत्त्व दिले नाही. “मला तर कळलंच नाही की मी माही भाईला मागे टाकलं. वैयक्तिक यश चांगलं असतं, त्यातून आत्मविश्वास वाढतो. पण मला खरी आनंदाची गोष्ट म्हणजे धोनीसारख्या ट्रॉफी जिंकणं,” असे राहुल म्हणाला. क्रिकेट हा संघाचा खेळ असल्याने विजेतेपद मिळवणे आणि यशस्वी संघाचा भाग बनणे हेच आपले ध्येय असल्याचे त्याने सांगितले.
याचबरोबर एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दलही राहुलने भाष्य केले. या मैदानावर त्याचा रेकॉर्ड नेहमीच चांगला राहिला आहे. “चिन्नास्वामी माझ्यासाठी खूप खास आहे. मी तिथेच मोठा झालो. त्या मैदानावर खेळताना वेगळाच आत्मविश्वास मिळतो आणि प्रेक्षकांचाही पाठिंबा जाणवतो,” असे तो म्हणाला.
राहुलने पुढे सांगितले की, कोणत्याही विशेष रणनीतीपेक्षा परिस्थितीनुसार खेळण्यावर त्याचा भर असतो. “मी आरसीबीविरुद्ध खास योजना आहे का, याचा विचार केला, पण मला ठोस उत्तर मिळालं नाही. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करतो आणि संघासाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो,” असे त्याने स्पष्ट केले.
तसेच, भारताच्या नव्या पिढीतील फलंदाजांच्या निर्भय आणि आक्रमक खेळाचाही राहुलने गौरव केला. “आजचे तरुण खेळाडू कोणत्याही गोलंदाजाच्या नावाला घाबरत नाहीत. मग तो जसप्रीत बुमराह असो किंवा पॅट कमिन्स, ते फक्त चेंडू पाहतात आणि त्याला सीमारेषेबाहेर पाठवण्याचा प्रयत्न करतात,” असे तो म्हणाला.
त्याच्या मते, ही आक्रमक मानसिकता टी-२० क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. युवा खेळाडूंचा आत्मविश्वास आणि निर्भयता भारतीय क्रिकेटसाठी सकारात्मक संकेत आहेत. भविष्यात भारतीय संघ अधिक मजबूत होईल, असा विश्वासही राहुलने व्यक्त केला.
Comments are closed.