राजस्थानचा ‘रॉयल’ थाट दिल्लीने धाब्यावर बसवला! घरात घुसून डीसीने लोळवले, आरआरचा शेवटच्या 6 सामन
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स IPL 2026 : आयपीएल 2026 मधील 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात 7 गडी राखून पराभव केला. कर्णधार रियान परागच्या 90 धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 225 धावांचा डोंगर उभा केला. पण दिल्लीने फक्त 3 गडी गमावून पूर्ण केले. या विजयामुळे दिल्लीने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून प्लेऑफची चुरस आता अधिकच वाढली आहे.
वैभव आणि जैस्वाल नापास, पण रियान पराग पास
राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी केली. पण मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला आऊट करत पहिला धक्का दिला आणि त्याने 6 धावा केल्या. त्यानंतर काईल जेमिसनने वैभव सूर्यवंशीला 4 धावांवर बाद करून राजस्थानला दुसरा धक्का दिला. यानंतर, कर्णधार रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 102 धावांची शानदार भागीदारी केली, जी अक्षर पटेलने तोडली. त्याने ध्रुव जुरेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जुरेलने 30 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या. यानंतर रियान पराग आणि रवींद्र जडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली, पण मिचेल स्टार्कने एकाच षटकात दोन्ही फलंदाजांना बाद करून राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का दिला.
रियान परागनंतर डोनोव्हान फरेराने घातला तांडव
मिचेल स्टार्कने 17 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाला बाद केले. जडेजाने 14 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर रियान परागला बाद केले. रियान परागने 50 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 5 षटकारांसह 90 धावा केल्या. त्यानंतर डोनोव्हान फरेराने शेवटच्या दोन षटकांमध्ये 300 हून अधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला 225 धावांपर्यंत पोहोचवले. फरेराने दोन चौकार आणि सहा षटकारांसह अवघ्या 14 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा ठोकल्या.
राहुल, निसांका आणि राणाची ‘तुफानी’ फलंदाजी
226 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने आक्रमक सुरुवात केली. दिल्लीच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात केएल राहुल आणि पथुम निस्संका यांनी केली. दोन्ही फलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला वेगवान सुरुवात करून दिली. राहुल आणि निस्संका यांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली, जी रवींद्र जडेजाने तोडली. जडेजाने पथुम निस्संकाला बाद केले. निस्संकाने 33 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली, पण तुषार देशपांडेने नितीश राणाला बाद केले. नितीश राणाने 33 धावा केल्या. त्यानंतर जोफ्रा आर्चरने प्रस्थापित फलंदाज केएल राहुलला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का दिला. केएल राहुलने 40 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांसह 75 धावांची खेळी केली. शेवटी आशुतोष शर्माने डीसीला या हंगामातील चौथा विजय मिळून दिला.
गुणतालिकेतील समीकरण बदलले
या पराभवानंतरही राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. आरआरने आतापर्यंत 10 सामने खेळले असून त्यापैकी 6 जिंकले आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे राजस्थानने आपल्या मागील 6 सामन्यांपैकी 4 सामने गमावले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने या विजयासह मोलाचे 2 गुण मिळवले आहेत. दिल्लीचे आता 9 सामन्यांतून 4 विजय झाले असून 8 गुणांसह ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.