IPL 2026 – शतकांचा पाऊस, पण विजय दुरावलेलाच, यंदाच्या आयपीएलमध्ये शतकवीरांचा होतोय गेम
आयपीएल म्हणजे फटकेबाजीचा अन् षटकारबाजीचा उत्सव. इथे शतक म्हणजे विजयाची हमी, अशी एक जुनी समजूत होती. पण यंदाच्या आयपीएलने ती समजूत अक्षरशः धुळीस मिळवली आहे. इथे शतक झळकतेय, ठोकलेय जातेय, पण स्कोअर बोर्डवर विजय मात्र हसत नाही. असं यापूर्वी कधीच दिसलं नव्हतं.
1 मेपर्यंत 43 सामने झाले आणि त्यात तब्बल 9 शतकं ठोकली गेली. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या 9 शतकांपैकी चार वेळाच त्या खेळाडूंच्या संघाने विजय साजरा केला. उरलेल्या पाच वेळा शतकवीर उभा, पण संघ धारातीर्थी पडलेला दिसला.
चेन्नईचा संजू सॅमसन हा मात्र अपवाद ठरलाय. चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याने दोन धडाकेबाज शतकं झळकावली आणि दोन्ही वेळा विजय मिळवून दिला. त्याच धर्तीवर तिलक वर्मा (मुंबई इंडियन्स) आणि अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद) यांनीही शतक ठोकत संघाला जिंकवले.
पण खरी कहाणी इथेच पलटी घेते. क्विंटन डी कॉक आणि रायन रिकल्टन यांनी शतके झळकावली, तरीही मुंबई इंडियन्स पराभूत झाली. लोकेश राहुलने 152 धावांची करिअरमधील सर्वोत्तम खेळी केली, पण दिल्लीला विक्रमी हार टाळता आली नाही. साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) आणि वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) यांनीही शतपं झळकावली, पण त्यांच्या संघाला पराभवाची चव चाखावी लागली. म्हणजे शतक विजयाची गॅरंटी राहिलेली नाही. क्रिकेट आता वन मॅन शो नाही. पूर्ण संघाचा खेळच निकाल ठरवतो. जेतेपदाकडे जाणारा रस्ता हा अजूनही टीमवर्कचाच आहे.
Comments are closed.