HSC Result 2026 – बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभागाचा दबदबा कायम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 9 विभागीय मंडळांचा एकत्रित निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला असून निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींनी मुलांपेक्षा 6.35 टक्क्यांनी अधिक यश मिळवून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात कोकण विभागाचा दबदबा कायम राहिला आहे. कोकण विभागाने 94.14 टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले आहे. पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि लातूर या उर्वरित आठ मंडळांच्या तुलनेत कोकणचा निकाल सरस ठरला आहे. लातूर विभागाचा सर्वात कमी अर्थात 84.14 टक्के निकाल लागला आहे.
- एकूण निकाल – 89.79 टक्के
- मुलींचा निकाल – 93.15 टक्के
- मुलांचा निकाल – 86.80 टक्के
दरम्यान, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी खालावलेली पाहायला मिळत आहे. 2024 मध्ये 93.37 टक्के निकाल लागला होता, तर 2025 मध्ये 91.88 टक्के निकाल लागला होता. पण यंदा हा आकडा 89.79 टक्क्यांवर पोहोचल्याने निकालाचा आलेख सलग दुसऱ्या वर्षी खाली घसरल्याचे स्पष्ट होत आहे.
परीक्षा कालावधीत एकूण 15 एफआयआर दाखल करण्यात आल्या असून नियमबाह्य कृत्य केल्याप्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहितीही यावेळी त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली.
शाखा काढा
- विज्ञान – 96.44 टक्के
- कला – 78.02 टक्के
- वाणिज्य – 87.04 टक्के,
- व्यवसाय अभ्यासक्रम – 82.74 टक्के
- आयटीआय – 81.78 टक्के
निकाल कुठे पाहाल?
विद्यार्थ्यांना आज दुपारी 1 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला बैठक क्रमांक आणि आईचे नाव आवश्यक आहे.
असा पहा निकाल
- mahahsscboard.in किंवा hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होमपेजवरील HSC Result 2026 या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा सीट क्रमांक आणि आईचे पहिले नाव टाईप करा.
- Submit वर क्लीक करा. तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
- गुणपत्रिका डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा.
Comments are closed.