व्यावसायिक गॅसच्या दरात हजार रुपयांनी वाढ, हॉटेलमधला मेनू महाग होण्याची दाट शक्यता

फाइल फोटो

केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात जवळपास 993 रुपयांची मोठी वाढ केल्याने मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये चिंता आणि अस्वस्थता पसरली आहे. यामुळे आता मेनू दर 10 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील टप्प्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढही होऊ शकते. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

नव्या दरानुसार 19 किलो व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2,031 रुपयांवरून थेट 3,024 रुपये झाली आहे. तसेच स्थलांतरित कामगार आणि छोट्या विक्रेत्यांकडून वापरल्या जाणाऱ्या 5 किलो ‘छोटू’ सिलिंडरची किंमत 596.50 रुपयांवरून 838 रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र, 14.2 किलो घरगुती सिलिंडरचा दर सध्या 912.50 रुपये इतकाच कायम आहे.

हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम

AHAR चे अध्यक्ष विजय के. शेट्टी यांनी या दरवाढीला “सरकारने हॉटेल व्यावसायिकांवर जवळून झाडलेली गोळी” असे संबोधले. इराण संघर्षानंतरची ही तिसरी मोठी दरवाढ असल्याचे त्यांनी सांगितले.

उडुपी श्रीकृष्ण आणि नूतन बार अँड रेस्टॉरंटचे मालक आरव शेट्टी म्हणाले की, “युद्धकाळापासून आम्ही दरवाढ सहन करत होतो. पण आता प्रत्येक सिलिंडरमागे सुमारे 1,500 चा अतिरिक्त खर्च होत असल्याने मेनू दर किमान 20 टक्के वाढवावे लागतील.”

कुंभारवाड्यातील ‘बारह हांडी’ रेस्टॉरंट मालकाने सांगितले, “आमचे ग्राहक रोजंदारीवर काम करणारे आहेत. त्यांच्यावर दरवाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. दोन महिन्यांत दोनदा दर वाढल्याने त्यांना इथले अन्न परवडणार नाही.”

बांद्र्यातील ‘लकी रेस्टॉरंट’चे मोहसिन हुसैनी म्हणाले, “दरवाढ अपेक्षित होती, पण इतकी मोठी नाही. दररोज 10-12 सिलिंडर लागतात. आता किमान 10% दरवाढ करावी लागेल.”

फोर्टमधील ‘आयडियल कॉर्नर’चे परवेज पटेल म्हणाले की, सिलिंडरच्या एक हजार रुपयांची वाढ असह्य आहे. फाईन डायनिंगमध्ये मार्जिन असते, पण आमच्यासारख्या परवडणाऱ्या रेस्टॉरंट्ससाठी हा मोठा धक्का आहे.”

बेकरी उद्योगालाही फटका

मुंबई महानगरपालिकेच्या आदेशानुसार लाकूड/कोळशाऐवजी एलपीजी आणि पीएनजीकडे वळलेल्या बेकरी उद्योगालाही याचा मोठा फटका बसला आहे. ‘क्वालिटी बेकर्स’चे मालक सलाउद्दीन खान म्हणाले, “एलपीजी दरवाढीमुळे उत्पादन खर्च थेट वाढेल. त्यामुळे दरवाढ अपरिहार्य आहे.”

उद्योगावर दबाव, बंद पडण्याची भीती
हॉटेल अँड रेस्टॉरेंट असोसिएशन (पश्चिम भारत) चे प्रवक्ते प्रदीप शेट्टी यांनी सांगितले की, मार्च, एप्रिल आणि आताच्या वाढीमुळे एकूण 1,332.50 रुपयांची वाढ झाली आहे. “पुरवठा अडचणी, कमी क्षमतेने काम आणि आर्थिक ताण यामुळे काही हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता आहे. 10-15 टक्के दरवाढ अपरिहार्य आहे, पण तीही अपुरी पडू शकते,” असे त्यांनी सांगितले.

कारण काय?

तेल कंपन्यांनी “जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता” (global turmoil) यामुळे ही दरवाढ
कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या एका वरिष्ठ सदस्याने डिझेल दरवाढही लवकरच होऊ शकते असा इशारा दिला आहे.

Comments are closed.