सरकारी रुग्णालयांपेक्षा खासगीत प्रसूतीचा खर्च 16 पट अधिक, NSO अहवालातून धक्कादायक वास्तव

खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूतीचा खर्च सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत जवळपास 16 पट अधिक असल्याचे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (NSO) ताज्या आरोग्य अहवालातून समोर आले आहे. खासगी आरोग्य सेवांकडे वाढत्या कलामुळे रुग्णांच्या खिशावरचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

अहवालानुसार, गेल्या 365 दिवसांतील प्रति प्रसूती सरासरी खर्च खासगी रुग्णालयांमध्ये 37,630 रुपये इतका आहे (यात सरकारी मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे), तर सरकारी रुग्णालयांमध्ये हा खर्च केवळ 2,299 रुपये इतका आहे. मध्यम खर्चाच्या (median) तुलनेतही मोठी दरी दिसून येते—खासगीत 32,000 रुपये तर सरकारीत फक्त 801 रुपये खर्च नोंदवला गेला आहे. यावरून खासगी आरोग्य सेवेमुळे कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण येत असल्याचे स्पष्ट होते.

अहवालात प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयांकडे वळण्याचा कल वाढत असल्याचेही दिसून आले आहे. ग्रामीण भागात खासगी रुग्णालयांतील प्रसूतींचे प्रमाण 21.3 टक्क्यांवरू 28.8 टक्के झाले आहे, तर शहरी भागात हे प्रमाण 47.8 टक्के वरून 50.8 टक्के पर्यंत वाढले आहे.

ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहारिया यांच्या मते, “खासगी रुग्णालयांमध्ये अधिक सुविधा, 24 तास सेवा आणि तुलनेने चांगल्या गुणवत्तेची धारणा यामुळे अनेक जण अधिक खर्च असूनही खासगी सेवांचा पर्याय निवडतात. ग्रामीण-शहरी सीमारेषा बदलत असल्याने आणि खासगी आरोग्य सेवा वाढत असल्याने हा कल अधिक वाढला आहे.”

तरीही एकूणच पाहता, विशेषतः ग्रामीण भागात प्रसूतींसाठी सरकारी रुग्णालयांचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणात होत आहे, तर शहरी भागात खासगी रुग्णालयांची भूमिका अधिक आहे.

देशात होणाऱ्या एकूण 96.2 टक्के प्रसूती रुग्णालयातच होत आहेत. 2017-18 ते 2025 या कालावधीत ग्रामीण भागात हे प्रमाण 90.5 टक्के वरून 95.6 टक्के, तर शहरी भागात 96.1 टक्के वरून 97.8 टक्के पर्यंत वाढले आहे.

Comments are closed.