Nagpur news – भीषण आगीत निम्म्या गावाची राखरांगोळी; गोठ्यातील जनावरंही होरपळली, अनेक संसार उघड्यावर
नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत निम्म्या गावाची राखरांगोळी झाली आहे. शेतातील पालापाचोळा जाळताना सोसाट्याचा वारा सुटला आणि आग भडकली अन् पाहता पाहता संपूर्ण गावाला आगीने कवेत घेतले. या आगीत शेतकऱ्यांच्या गोठ्यातील मुकी जनावरंही होरपळून गेली असून अनेक कुटुंबांचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गावाशेजारील एका शेतात कचरा आणि पालापाचोळा जाळण्यात येत होता. मात्र, सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या प्रचंड वाऱ्यामुळे आगीच्या ठिणग्या उडून थेट गावापर्यंत पोहोचल्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी घरासमोर मोठ्या प्रमाणात लाकडे आणि चारा जमा करून ठेवला होता. वाऱ्याच्या वेगामुळे या लाकडांनी तात्काळ पेट घेतला आणि आगीने भीषण रूप धारण केले.
काही मिनिटांतच गावातील मातीची आणि कवलांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही आग इतकी वेगाने पसरली की अनेक कुटुंबांना घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य किंवा कपडे बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही.
दरम्यान, या आगीत आपत्तीत केवळ घरेच जळाली नाहीत, तर शेतकऱ्यांचे आर्थिक कणा असलेले पशुधनही होरपळले. गोठ्यात बांधलेल्या गायी, बैल आणि शेळ्यांना आगीतून बाहेर काढणे अशक्य झाल्याने अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचेमोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर आता उदरनिर्वाहाचे संकट ओढवले आहे.
अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच नागपूर जिल्ह्याच्या विविध भागांतून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले. स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांनीही जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने, या भीषण आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे, मात्र मालमत्तेचे नुकसान लाखोंच्या घरात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Comments are closed.