मिसिंग लिंक हा काही पिकनीक स्पॉट नाही, MSRDC कडून सूचना जारी

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाहनचालकांना महत्त्वाचा सुचना दिली आहे. हा हाय स्पीड मार्ग असून पर्यटनस्थळ किंवा पिकनिक स्पॉट नाहिये. इथे थांबणे धोकादायक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.  टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, 13.3 किमी लांबीचा हा संपूर्ण अ‍ॅक्सेस-कंट्रोल्ड मार्ग 24×7 अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली आहे. यात दोन बोगद्यांसह केबल-स्टेड पुलाचाही समावेश आहे. या मार्गावर वाहन थांबवल्यास वाहतुकीचा प्रवाह बिघडतो आणि गंभीर अपघाताचा धोका निर्माण होतो. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

उद्घाटनानंतर शुक्रवारी सायंकाळी केबल-स्टेड पुलावर अनेक वाहनचालकांनी गाड्या थांबवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

या मार्गावर कारसाठी कमाल वेगमर्यादा 100 किमी प्रतितास, तर बस आणि जड वाहनांसाठी 80 किमी प्रतितास ठेवण्यात आली आहे.पण चालकांनी याच वेगमर्यादेत गाडी चालवावी असा नियम नाही, तर चालकांनी लेनची शिस्त पाळत वेग नियंत्रणात ठेवावा, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सुमारे 6,695 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प खोपोली ते कुसगावदरम्यानचा आहे. यामुळे लोणावळा–खोपोली घाटातील अपघातप्रवण आणि वाहतूक कोंडीचा मार्ग टाळता येणार आहे. नव्या मार्गामुळे अंतर 19 किमीवरून 13.3 किमीपर्यंत कमी झाले असून मुंबई–पुणे प्रवासात 20 ते 30 मिनिटांची बचत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटनानंतर मुंबईकडे जाणारा मार्ग तात्काळ सुरू करण्यात आला. मात्र पुणे–मुंबई मार्ग मध्यरात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. उद्घाटनासाठी उभारण्यात आलेली मंडप व्यवस्था हटवण्यासाठी ही तात्पुरती बंदी घालण्यात आली होती.

या बंदीमुळे प्रवासी आणि काही राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी पुणे–मुंबई प्रवासादरम्यान जुन्या घाटमार्गावर वळवण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला. “वाहतूक कोंडी संपेल असे सांगितले, पण दुसऱ्याच दिवशी मंडप काढण्यासाठी मार्ग बंद ठेवणे टाळता आले असते,” अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, साधारण 2.5 तासांचा प्रवास तब्बल 4 तासांचा झाला.

उद्घाटनावेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही काळ टोल न घेता वाहनांना मार्ग मोकळा करून देण्याचे निर्देश दिले होते. शनिवारी दुपारपर्यंत सर्व मार्ग मोकळे करण्यात आले असून वाहतूक सुरळीत झाली असल्याचे एमएसआरडीसीने सांगितले.

तथापि, या मार्गाचा मुख्य उद्देश जलद आणि सुरक्षित प्रवास हा असून, “नो-स्टॉपिंग” नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Comments are closed.