मुलीच्या लग्नाआधीच इंदुरीकर महाराज ट्रोल; राजेशाही विवाह सोहळ्यावर टीकेची झोड
गेल्या तीन दशकांपासून आपल्या कीर्तनातून प्रबोधन करताना सामाजिक प्रवृत्तीवर हल्ला करणारे आणि समस्त जनतेला साधेपणाचा उपदेश करणारे तसेच प्रत्यक्षात स्वतः साठी भव्यतेचा आविष्कार ठसक्यात दाखवत हा विरोधाभास पुन्हा एकदा समोर आल्याने ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर हे मुलीच्या आज होणाऱ्या राजेशाही थाटातील विवाह सोहळ्यावरून चांगलेच ट्रोल झाले आहेत.
मुलीच्या साखरपुडा सोहळ्याला अनेक गोष्टींना छेद देत गाजावाजा करत लाखो रुपयांची उधळण महाराजांनी केली. यावरून ते ट्रोल झाले होते. याचा संताप अनावर झाल्याने संयम पाळण्याऐवजी यापेक्षाही मुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि राजेशाही थाटानेच करून दाखवू, अशी खूणगाठच त्यांनी बोलून दाखविली होती. इथूनच मुलीच्या राजेशाही लग्नाची बीजे पेरल्या गेली आणि महाराज कामाला लागले. आता आज होणाऱ्या लग्नाची भव्यदिव्यता, राजेशाही थाट, भरजरी वस्त्राची खरेदी, सोने नाणे यासह राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून, आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, संघटना, उद्योगपती यांना वेगवेगळ्या छापलेल्या पत्रिका, तसेच बल्क संदेशाच्या माध्यमातून आमंत्रण, निमंत्रण देण्यात आली. या एकूणच घटनेने ह.भ.प. निवृत्तीनाथ इंदुरीकर महाराज चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांची कन्या ज्ञानेश्वरी हिच्या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर तसेच वारकरी संप्रदायातूनही जोरदार टीका होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मालपाणी हेल्प क्लब येथे हळदी समारंभ झाला. उच्चभ्रू आणि महागड्या विवाह सोहळ्यांसाठीच ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी हळदीसारखा कार्यक्रम झाल्याने चर्चाना उधाण आले.
ज्ञानेश्वरी हिचा विवाह जुन्नर येथील साहिल चिलप यांच्याशी आज सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांच्या शुभमुहूर्तावर पार पडणार आहे. यासाठी संगमनेरजवळील गुंजाळवाडी परिसरात तब्बल ४० एकर जागेत भव्य मंडप उभारण्यात आला आहे. येथे पार्किंग, भोजन आणि सजावटीची जोरदार तयारी केली आहे. या सर्व तयारीवरून आणि केलेल्या खर्चावरून हा विवाह सोहळा ‘राजेशाही’ ठरणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून ‘लग्न साधे करा, खर्च टाळा, संसार सुखाचा होतो’, असा उपदेश देणारे इंदुरीकर महाराज स्वतःच या तत्त्वांना छेद देत असल्याची टीका होत आहे.
हरिनाम सप्ताहाच्या पवित्र भूमीतच विवाह सोहळा
ज्या भूमीत अखंड हरिनामाचा गजर घुमतो, जिथे कीर्तन प्रवचनातून अध्यात्माची ऊर्जा निर्माण होते, ती भूमी पवित्र आणि पुण्यवान मानली जाते. अशाच पवित्रस्थळी कन्येचा विवाह व्हावा, या धारणा मनात ठेवत इंदुरीकर महाराज यांनी मुलीच्या विवाहासाठी गुंजाळवाडी येथील ठिकाणाची निवड केल्याची चर्चा रंगली आहे.
प्रबोधनाची की धनाची लोकप्रियता; ट्रोल्सचा मारा
- कीर्तनातून संयम, साधेपणा आणि मूल्यांची शिकवण देणारे इंदुरीकर महाराज सध्या कन्या ‘ज्ञानेश्वरी’ च्या भव्यदिव्य लग्नसोहळ्यामुळे ट्रोलिंगच्या केंद्रस्थानी आले आहेत. उपदेश एक आणि आचरण दुसरेच; असा टोला लगावत महाराजांना धारेवर धरले जात आहे.
- लग्नासाठी ४० एकरात उभारलेला ज्ञानेश्वरीसाठीचा लग्नमंडप, पैशाची उधळपट्टी, उंची भरधारी पेहराव नि पोशाख, वस्त्रांचा महिमा, दागदागिन्यांची खरेदी, कैक खाद्य पदार्थांची मेजवानी आणि भौतिक सुखाचा मोठा लवाजमा हेच का ते साधेपणा, असा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे.
Comments are closed.