IPL 2026 – गुजरात जोरात! होल्डर ठरला विजयाचा शिल्पकार, मुंबईकर सूर्यांशची खेळी व्यर्थ
अव्वल स्थानावर असलेल्या पंजाब किंग्जला अखेर गुजरात टायटन्सने रविवारी धुळ चारली. मुंबईकर सूर्यांश शेडगेने अर्धशतक झळकावत पंजाबच्या संघाला सावरले. त्यामुळेच पंजाबच्या संघाला 163 धावांपर्यंत तरी मजल मारता आली. भेदक गोलंदाजी करणारा जेसन होल्डर यावेळी विजयाचा शिल्पकार ठरला. पंजाबच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग गुजरातच्या संघाने केला आणि पंजाबवर मात केली. वॉशिंग्टन सुंदरच्या षटकाराच्या जोरावर गुजरातने पंजाबवर चार विकेट्स राखत विजय मिळवला. या विजयासह गुजरातच्या संघाचे 12 गुण झाले आहेत.
गुजरातने नाणेफेक जिंकली आणि त्यांचा पंजाबला प्रथम फलंदाजीला आमंत्रित करण्याचा निर्णय योग्य ठरला. कारण गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत पंजाबची 5 बाद 47 अशी दयनीय अवस्था केली होती. पण त्यानंतर संघासाठी संकटमोचक ठरला तो सूर्यांश. सूर्यांशने यावेळी 29 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 57 धावांची दमदार खेळी साकारली. सूर्यांशला मार्पस स्टायनिसने 40 धावा करत चांगली साथ दिली. गुजरातला पहिल्याच षटकात दोन विकेट्स मोहम्मद सिराजने मिळवून दिले होते. त्यानंतर जेसन होल्डरने चार विकेट्स मिळवत पंजाबचे पंबरडे मोडले.
पंजाबच्या 164 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा कर्णधार शुभमन गिल फक्त 5 धावांवर बाद झाला. पण साई सुदर्शनने अर्धशतक झळकावत संघाला सावरले. साईने यावेळी पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 57 धावांची खेळी साकारली. साई बाद झाल्यावर वॉशिंग्टन सुंदरने संघाची धुरा सांभाळली. सुंदरने अखेरच्या षटकापर्यंत संघाचा किल्ला लढवला आणि षटकारासह संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुंदरने यावेळी 23 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 40 धावा केल्या.
Comments are closed.