मुंबईचे मैदान हिंदुस्थानी नौदलाने मारले; बंडय़ा मारुतीच्या अखिल हिंदुस्थानी स्पर्धेत राज्याबाहेरील संघांचा दबदबा
साखळीत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या तगडय़ा संघांचा उपांत्य फेरीतच धुव्वा उडवत हिंदुस्थानी नौदल आणि यूपी योद्धा या संघांनी बंडय़ा मारुती सेवा मंडळाच्या अखिल हिंदुस्थानी कबड्डी स्पर्धेची अंतिम फेरी गाठत मुंबईचे मैदान मारले. मात्र दोन्ही संघात झालेला अंतिम सामना रंगलाच नाही. नौदलाने यूपी योद्धाचा 46-27 असा फडशा पाडत अजिंक्यपद पटकावले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या कबड्डीच्या अखिल हिंदुस्थानी संग्रामात अखेर मुंबईच्या बलाढय़ संघांची धुळधाण उडवत महाराष्ट्राबाहेरील संघांनी आपली ताकद दाखवली. बंडय़ा मारुती संघाने या स्पर्धेच्या तीन महिने आधीच तारखा नोंदवूनही याच स्पर्धेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी घेण्याचा पराक्रम विदर्भ कबड्डी संघटनेने केला. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने बंडय़ा मारुती मंडळाच्या कबड्डी स्पर्धेकडे कानाडोळा केला. परिणामतः दोन्ही स्पर्धांमध्ये राज्यातील चांगले खेळाडू विभागले गेले आणि या विभाजनामुळे राज्याबाहेरून आलेले संघ राज्यातील संघापेक्षा वरचढ ठरले.
कबड्डीप्रेमींसाठी शेवटचा दिवस निराशेचा
पहिले चार दिवस या स्पर्धेने कबड्डीप्रेमींना थराराची मेजवानी दिली होती. मात्र शेवटच्या दिवशी थरार गायब झाला तो परतलाच नाही. या एकतर्फी सामन्यांमुळे चाहत्यांची घोर निराशा झाली. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने एकतर्फी झाले. हिंदुस्थानी नौदलाच्या भरत आणि हिमांशूने तुफानी चढाया करत आयएसपीएलचा 56-42 असा सहज पराभव केला. नीरज मिसाळने आपल्या वेगवान चढायांच्या जोरावर नौदलाला चांगलेच झुंजवले, पण त्याच्या खेळाला अनिल जस्ता आणि जीत सिंहची साथ लाभली नाही.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात यूपी योद्धाच्या गगन गौडासमोर युनियन बँकेचा खेळ फिका ठरला. गगनने पहिल्या सत्रातच युनियन बँकेचा खेळ खल्लास करताना चक्क चढाईचे 16 गुण मिळवत संघाला 37-14 अशी आघाडी मिळवून दिली. गौडाने एपूण 20 गुण मिळवत 46-23 अशा फरकाने अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम फेरीत नौदलाने यूपीच्या गगन गौडालाच जेरबंद करत अर्धे यश मिळवले. त्यांनी गगनची पाचवेळा यशस्वी पकड करत आपले जेतेपद निश्चित केले. भरत हुडा आणि रोहित तोमरच्या चढायांनी नौदलाला 46-27 असा सहजसुंदर विजय मिळवून दिला. स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणारा भरत हुडाच ‘मालिकावीर’ ठरला. चढाईत 85 गुण मिळवत गगन गौडाने ‘चढाईवीरा’चा पुरस्कार जिंकला. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा खासदार अरविंद सावंत, आमदार आणि स्पर्धा आयोजक सुनील शिंदे, आमदार अॅड. अनिल परब, आमदार सचिन अहिर, माजी खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत पार पडला.
Comments are closed.