IPL 2026 – आता मुंबईचा जिंकण्यासाठी लढा, आज इंडियन्सची गाठ खचलेल्या लखनौशी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सलग पराभवांनी खचलेले आणि प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळजवळ तडीपार झालेले मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ सोमवारी आमने सामने येत आहेत. मुंबईचा लढा जिंकण्यासाठी असेल तर लखनौला आपल्या प्ले ऑफ आव्हानाला ऑक्सिजन देण्यासाठी वानखेडेवर उतरावे लागणार आहे.

आयपीएलच्या इतिहासात 14 गुण मिळवणारे संघही प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. पण यासाठी खूप चमत्कारांची आवश्यकता आहे. इतके चमत्कार होणेही कठीण आहे, पण मुंबई पुढील पाचही सामने जिंकून हवा निर्माण करू शकते. मुंबईने आतापर्यंत पराभवाची एकदा हॅटट्रिक आणि एकदा चौकार ठोकला आहे. इतक्या पराभवानी खचलेला संघ पुन्हा उभारी कठीण आहे. लखनौचीही अवस्था फार वेगळी नाही. फरक इतकाच आहे की, ते आठ सामन्यांत सहा हरले आहेत. लखनौसाठी प्ले ऑफचा अंधुक दिवा फडफडतोय. उद्या विजयाने त्या दिव्यात काहीसे तेल पडू शकते. पण क्रिकेटच्या भाषेत असे इतिहास क्वचित घडतात.

फक्त रोहितच्या फलंदाजीचा दिलासा

मुंबईकरांनी आता अपेक्षा सोडल्या आहेत. मुंबई राखेतून भरारी घेईल, असे पुणालाही वाटत नाही. चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर उद्या मुंबईचे चाहते असा विचारही करणार नाहीत. मात्र तालिकेत मुंबईच्या खाली असलेल्या लखनौला तरी हरवावे, या अपेक्षेने क्रिकेटप्रेमी वानखेडेवर एन्जॉय करायला येणार आहेत. या सामन्यात त्यांना रोहित शर्माची फलंदाजीही पाहायचीय. गेले पाच सामने मुंबई रोहितशिवाय खेळतेय. किमान आतातरी त्याने मैदानात उतरून मुंबईला धीर द्यावा अशी अपेक्षा आहे.

लखनौला पराभव रोखायचाय

गेल्या सामन्यात लखनौला सुपर ओव्हरमध्ये हार सहन करावी लागली होती. तो त्यांचा स्पर्धेतील सलग पाचवा पराभव होता. आतापर्यंत सलग पाच पराभव सहन करणारा लखनौ एकमेव संघ आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाची झालेली वाताहत पुणालाही पाहावत नाहीय. त्यातच पंतच्या फटकेबाजीही गायब झालीय. मिशेल मार्श आणि एडन मारक्रमसारखे झंझावाती असूनही त्यांचा संघ हरतोय. त्यांची फलंदाजी इतकी अपयशी ठरतेय की, त्यांच्या संघात 200 पेक्षा अधिक धावा करणारा मार्श हा एकटाच फलंदाज आहे.

Comments are closed.