IPL 2026 – हैदराबादला केकेआरचा धक्का

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सलग पाच विजयांसह सनरायझर्स हैदराबादच्या संघाने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. पण रविवारी झालेल्या घरच्याच सामन्यात हैदराबादला पाच विजयानंतर केकेआरने जोरदार धक्का दिला. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरिन यांनी भेदक गोलंदाजी करत हैदराबादला 165 धावांवर रोखले. त्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी दमदार फलंदाजी करत संघाला सात विकेट्स राखून दमदार विजय मिळवून दिला.

हैदराबादने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्विकारली खरी, पण त्यांची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. कारण अभिषेक शर्मा हा 15 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि ईशान किशन यांची चांगली जोडी जमली. ट्रेव्हिसने यावेळी तुफानी फटकेबाजी केली आणि संघाला तो मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने घेऊन जात होता. पण तो बाद झाला आणि त्यानंतर हैदराबादच्या संघाची धावगती वधारू शकली नाही. हेडने यावेळी फक्त 28 चेंडूंत 9 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 61 धावांची खेळी साकारली. हेडनंतर ईशानवर संघाची जबाबदारी होती. पण तो मोक्याच्या क्षणी 42 धावांवर बाद झाला आणि हैदराबाची सामन्यावरची पकड सुटली. त्यामुळेच हैदराबादला 165 धावांवर समाधान मानावे लागले. वरुणने तीन तर नरिनने दोन विकेट्स मिळवले.

केकेआरचा संघ विजयासाठी 166 धावांचे आव्हान घेऊन उतरला. सलामीवीर अॅलन फिनने फक्त 13 चेंडूंत 29 धावा करत संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणेने संघाची धुरा चोखपणे वाहिली. अजिंक्यने चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 43 धावा केल्या. अजिंक्यला अर्धशतक पूर्ण करता आले नसले तरी रघुवंशीने ती कसर भरून काढली. रघुवंशीने 5 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 59 धावांची खेळी साकारत संघाचा विजय सुकर केला.

Comments are closed.