दहावी-बारावीच्या परीक्षेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, राज्य मंडळाचे सूतोवाच
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत पुढील काळात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब होऊ शकतो. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कागदाचा वापर कमी करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका छपाईसाठी 10 कोटी 72 लाख 80 हजार 360 पृष्ठे, नमुना उत्तरपत्रिकांसाठी 19 लाख 29 हजार 380 पृष्ठे अशी एकूण 10 कोटी 92 लाख 09 हजार 740 पृष्ठांवर छपाई करण्यात आली. त्यासाठी अंदाजे 223 मेट्रिक टन कागद वापरण्यात आला. तसेच 1 कोटी 6 लाख 56 हजार उत्तरपत्रिकांची छपाई करण्यात आली. त्यासाठी अंदाजे 1700 मेट्रिक टन कागद वापरण्यात आला. हा कागदाचा वापर कमी करून डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे संकेत राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले, तर शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी त्याला दुजोरा दिला.
छायाचित्रासह प्रमाणपत्र
राज्य मंडळाने यंदापासून गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतंत्र न देता एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचे नाव आधारकार्डाप्रमाणे नमूद केले जाणार आहे. ही प्रमाणपत्रे 15 दिवसांत उपलब्ध होणार आहेत. या प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचे छायाचित्र, बारकोडचा वापर करण्यात आला आहे.
Comments are closed.