IPL 2026: 'गर्लफ्रेंड कल्चर' विरोधात बीसीसीआय उचलणार गंभीर पावले! हार्दिकसह ईशान-अर्शदीप अडचणीत?

आयपीएल २०२६ सामन्यांमधील ‘गर्लफ्रेंड कल्चर’बाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नाराज आहे. त्याला आळा घालण्यासाठी अधिक कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत मंडळ आहे, अशी माहिती समोर येत आहे. अलीकडेच अनेक क्रिकेटपटू आयपीएल सामन्यांदरम्यान त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत दिसले आहेत, ज्यामुळे संभाव्य धोके आणि अंतर्गत बाबी बाहेर फुटण्याबद्दल चिंता वाढली आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चर्चा सुरू असून पुढील बैठकीत या विषयावर निर्णय घेतला जाईल. खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय राहण्यास काही हरकत नसली तरी, गर्लफ्रेंड्सच्या बाबतीत अधिक कठोर मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता भासू शकते.

आयपीएल २०२६ दरम्यान अनेक वादग्रस्त घटना घडल्या, ज्याच्या बीसीसीआयला त्रास झाला आहे. राजस्थान रॉयल्सचे मीडिया मॅनेजर रोमी भिंदर यांनी डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरला. तसेच त्यांचा कर्णधार रियान पराग सामन्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये ई-सिगारेट ओढताना दिसला. या प्रकरणांमुळे बीसीसीआयने दोघांना मोठा दंडही ठोठावला आहे, मात्र आता मंडळ नवे नियम बनवण्याच्या तयारीत आहे.

आयपीएल १९ च्या हंगामामध्ये सहभागी होणारे अनेक खेळाडू त्यांच्या कथित प्रेयसींसोबत वारंवार दिसत आहेत. हार्दिक पांड्या, ईशान किशन, यशस्वी जायस्वाल आणि अर्शदीप सिंग हे अनेकदा त्यांच्या कथित प्रेयसींसोबत टीम बसमधून प्रवास करताना आणि टीम हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत दिसले आहेत.

पुढील आयपीएल हंगामापासून गर्लफ्रेंड्स खेळाडूंसोबत राहू शकतात की नाही, यावर मंडळ स्पष्ट नियम लागू करण्याची शक्यता आहे. हे नियम भारतीय संघालाही लागू होऊ शकतात. आणखी एका सूत्राने सांगितले की, आंतरराष्ट्रीय दौऱ्यांदरम्यानची व्यवस्था पूर्णपणे बीसीसीआयच्या नियंत्रणाखाली असते आणि भ्रष्टाचारविरोधी पथकाद्वारे (ACU) त्यावर कडक देखरेख ठेवली जाते.

बीसीसीआयने भारतीय संघाच्या परदेशी दौऱ्यांसाठी आधीच नियम कडक केले आहेत. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर मालिकेत झालेल्या पराभवानंतर बीसीसीआयने ठरवले की ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीच्या परदेश दौऱ्यांवर खेळाडू जोडीदारांसोबत जास्तीत जास्त दोन आठवडे राहू शकतात.

Comments are closed.