व्यावसायिकावर रॉडने जीवघेणा प्रहार, भिवंडीत हल्लेखोरांनी तरुणाचे हातपाय मोडले
भिवंडीत हल्लेखोरांनी एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला केला. बोअरिंगचे साहित्य चोरी केल्याच्या संशयावरून कमरुजमा शेख (३८) यांच्यावर पाच हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने जीवघेणा प्रहार केला. यात शेख यांचे हातपाय मोडले आहेत. याप्रकरणी शांतिनगर पोलीस ठाण्यात कबरुद्दीन सिद्दीकी, अफसर सिद्दीकी, इमरान अन्सारी, शहनवाज सिद्दीकी आणि आलम शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी फरार आहेत.
न्यू आजादनगर येथील कमरुजमा ३० एप्रिल रोजी मध्यरात्री दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी निजामी हॉटेललगत ५ ते ७ जणांच्या टोळक्याने त्यांना अडवले. बोअरिंगचे साहित्य चोरी केल्याच्या संशयावरून आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शेख यांचे दोन्ही हातपाय मोडले असून डोके, पाठ आणि पोटावर गंभीर दुखापत झाली आहे.
जखमी कमरुजमा यांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत.
Comments are closed.